पुणे : पेरणेफाटा परिसरात आलेल्या एका सराईत चोरट्याचा पाठलाग करुन खंडणी विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून ४ लाख रुपयांचे १०२ किलो चंदन व मोटार असा ५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.लक्ष्मण भीमा गायकवाड (वय ४२, रा. तरडोबाची वाडी, ता. शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गायकवाड याच्याकडे मिळालेले चंदन त्याला काही जणांनी विक्री केल्याचे सांगत आहे. त्यामुळे तो चंदन विकत घेणारा असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर मंचर व पारनेर पोलिस ठाण्यात पूर्वी गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.
खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी लोणीकंद, वाघोली, विमानगर या परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली, की चंदन तस्करी करणारे चंदन विक्री करण्यासाठी नगर रोड परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांच्या पथकाला पेरणे फाटा परिसरातून एक कार भरधाव येताना दिसली. त्यांनी कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता ती भरधाव निघून केली़ त्यामुळे पोलिसांनी कारचा पाठलाग करुन तिला वाळके वस्ती परिसरात पकडले़ त्याच्या कारमध्ये १०२ किलो चंदन मिळून आले. तसेच, ती कारदेखील जप्त करण्यात आली आहे. पुणे शहरात चंदनचोरीचे अनेक गुन्हे घडले आहेत. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.