संदीप क्षीरसागर पुन्हा अजित पवारांना भेटले; चर्चांना उधाण, पण समोर आलं वेगळं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:26 IST2025-02-16T16:25:34+5:302025-02-16T16:26:24+5:30
मागील काही दिवसांत आमदार क्षीरसागर हे दुसऱ्यांदा अजित पवारांना भेटल्याने राजकीय तर्क-वितर्क लढवले जात होते.

संदीप क्षीरसागर पुन्हा अजित पवारांना भेटले; चर्चांना उधाण, पण समोर आलं वेगळं कारण!
NCP Sandeep Kshirsagar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ही भेट झाली. मागील काही दिवसांत आमदार क्षीरसागर हे दुसऱ्यांदा अजित पवारांना भेटल्याने राजकीय तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र स्वत: अजित पवार यांनीच या भेटीमागील कारण सांगितलं आहे.
"बीड शहरात मागील २१ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आमदार म्हणून संदीप क्षीरसागर मला भेटले. ते दुसऱ्या पक्षाचे असले तरी काहीही ब्रेकिंग न्यूज चालवू नका," असं अजित पवार माध्यमांना उद्देशून म्हणाले.
दरम्यान, "मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. बीड विधानसभा मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संदीप क्षीरसागर मला शोधत इथं आले," असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवारांच्या पक्षाच्या इतरही आमदारांची अजित पवारांकडे रीघ
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी सलगी साधण्यास सुरुवात केली आहे की काय, या चर्चेनं जोर धरला आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातूनही काही नेते उमेदवारीसाठी शरद पवार गटाकडे गेले आणि निवडूनही आले होते. पण आता सत्ता महायुतीची असल्याने शरद पवार गटातील आमदार आता अजितदादांकडे जात आहे. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी निवडणुकीत अजितदादांवर टीका केली होती. नुकतेच त्यांनी अजितदादांची भेट घेतली. त्यांच्यासोबत माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि उमेश पाटीलही होते. यापूर्वी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी आपण नावालाच शरद पवार गटाकडे असून आमचीच सत्ता आहे, असे जाहीरपणे बोलले होते. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांपैकी अनेकजण आता सत्तेसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.