पुणे - पाच वर्षापूर्वी गडचिरोलीत असताना छोट्या कामांना सुरुवात केली होती. तेथे काम करण्यास अधिक वाव असल्याने आपण बढतीवर जाताना गडचिरोली परिक्षेत्र म्हणून मागून घेतली, असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. संदीप पाटील यांची आज पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्रपदी पदोन्नतीने बदली झाली आहे.
याबाबत संदीप पाटील म्हणाले, पुणे ग्रामीण येथे २ वर्षापूर्वी आलो, तेव्हा कोरेगाव भीमा येथे आदल्या वर्षी दंगल झाली होती. त्यामुळे यंदा देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोक येणार, त्यातून काही अघटित घडणार अशी भीती व्यक्त केली जात होती. पोलिसांचे मनोबलही खालावले होते. २०१९ मध्ये ते सर्वात मोठे आव्हान होते. देशभरातील मीडियाचे त्याकडे लक्ष होते. मोठा बंदोबस्ताबरोबरच सर्वांना विश्वासात घेऊन १ जानेवारीचा कार्यक्रम शांततेत पार पडल्याने देशभर चांगला संदेश गेला.
६६ गुन्हेगारी टोळ्यांवर मोकासह विविध प्रतिबंधक कायद्यांचा वापर करुन त्यांच्यावर नियंत्रण आणले. पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. बारामती येथे उपमुख्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. पोलिसांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या. पुणेकरांनीही आपल्या प्रयत्नांना चांगली साथ दिली.
गडचिरोलीमध्ये आपली बदली करण्यात आली नसून आपण ती मागून घेतली आहे, असे सांगून पाटील म्हणाले, ५ वर्षांपूर्वी आपण छोट्या प्रमाणावर कामाला सुरुवात केली आहे. पुस्तक भेट योजनेचा चांगला प्रतिसाद मिळाला. तेथे भरपूर काम करण्यास वाव आहे. त्यामुळे आपण गडचिरोलीला पसंती दिली.