सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो विकास आघाडी यांनी१५ जागांपैकी ८ जागा मिळवित बहुमत मिळविले होते. तर विरोधी भाजपच्या भाई के.डी.चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेलला ७ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण करुन सत्ता हस्तगत होण्याचा प्रयत्न होतोय का म्हणून याकडे तमाम तालुक्याचे लक्ष्य वेधले होते. अपेक्षेप्रमाणे बुधवार (दि.१०) रोजी झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या या निवडणूकीसाठी दोन्ही गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या निवडणुकीत अर्ज दाखल झाल्याने निवडणूकीची उत्कंठा ताणली गेली होती.
सरपंचपदाच्या निवडणुकीत झालेल्या गुप्त मतदानात संध्या चौधरी यांना ८ तर प्रतिस्पर्धी स्नेहल विठ्ठल चौधरी ७ मते व उपसरपंचपदाच्या निवडणूकीत निलेश खटाटे यांना ८ तर विजय चौधरी यांना ७ मते मिळाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल कृषी अधिकारी जितेंद्र ननावरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी गटाचे नेतृत्व सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपसरपंच राजेंद्र तानाजी चौधरी व युवा नेते अजिंक्य चौधरी यांनी केले. नवनिर्वाचित सरपंच संध्या चौधरी या राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरीक संघाचे जिल्हाध्यक्ष सोनबा चौधरी यांच्या स्नुषा आहेत.