पिंपरी-चिंचवड, दि. 21- पिंपळे गुरवमध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या दीपक पाटील (वय २१, राहणार काशिद पार्क, पिंपळे गुरव) असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
मंगळवार (ता. १९) रोजी रात्री साडेबारा वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला पिंपळे गुरव येथील शहीद भगतसिंग चौकात गोळीबार झाल्याची माहिती एका महिलेने दिली. त्यांनी तातडीने ती माहिती सांगवी पोलिसांना दिली. त्याप्रमाणे रात्रपाळीत काम करणारे पोलीस उपनिरिक्षक अमित शेटे व मार्शल तात्काळ घटना स्थळी हजर झाले होते. पण तेथे असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. बाजूला असणाऱ्या सुरक्षा रक्षकांचीही शेटे यांनी चौकशी केली. पोलीस नियंत्रण कक्षास फोन करणाऱ्या व्यक्तीनेही त्याचा फोन बंद केल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर हिंजवडी व पुणेशहराच्या रात्रपाळीतील पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळास भेट दिली व अधिक पोलीस कर्मचारी वर्गास तेथे पाचारण केलं. अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त बावीस्कर, गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम पाटील, वरीष्ठ पोलिस निरिक्षक व सांगवी पोलिस ठाण्याचे प्रमुख अजय चांदखेडे, अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरिक्षक बलभीम ननवरे, अमित शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फोन करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली होती
त्यानुसार पोलिसांना आलेल्या फोन धारकाचा शोध घेतला असता तो हनुमान सुधाकर कलगाने (वय १८, राहणार पिंपळे गुरव) याचा निघाला. त्याने फोन सोमवार (ता. १८) रोजी रात्री दहा वाजता चोरीस गेल्याचं सांगितलं. त्यामुळे गुंता अधिकच वाढत गेला. पण पोलिसांनी पुढे कसून तपास करत आरोपी प्रसाद उर्फ लल्या याला अटक केली. आरोपीने कलगाने यांचा फोन चोरी केल्याची तसंच महिलेच्या आवाजात फोन करून गोळीबार झाल्याची तक्रार केली असल्याची कबुली दिली. पण असा कुठलाही गोळीबार तेथे झाला नसल्याचं पोलीस तपासातून उघड झालं.