पुणे : नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर लिखित संगीत द्रौपदी नाटकाच्या शताब्दी सांगतेनिमित्त ‘द्रौपदी आणि बालगंधर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने संगीत द्रौपदी नाटकातील नाट्यप्रवेश आणि नाट्यगीते ऐकण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम १२ डिसेंबरला बालगंधवर्व रंगमंदिरात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे व कादरबक्श खाँ साहेब यांची संगीत रंगभूमीवरील परंपरा पुढे चालविणा-या अनुराधा राजहंस, ज्योत्स्ना बडवे, रूपा बावळे, राहुल गोळे, दीपक टेंबे, फैय्याज हुसेन खाँ व अन्वर कुरेशी यांचा सत्कार या कार्यक्रमात पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त संवाद व श्री खंडेराय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बालगंधर्व रसिक मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती ‘संवाद’चे अध्यक्ष सुनील महाजन आणि बालगंधर्व रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी दिली. गायिका बकुळ पंडित, सुरेश साखवळकर, रवींद्र कुलकर्णी व अस्मिता चिंचाळकर हे गायक कलावंत असून राहुल गोळे (ऑर्गन), केदार कुलकर्णी (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) साथसंगत करणार आहेत.