पुणे: “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडणुका घेतल्यास भाजपला फटका बसू शकतो, त्यामुळे त्यांना केंद्रात पाठवा, असा नाराजीचा सूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत उमटला आहे, तसेच पंकजा मुंडे यांच्या यात्रेला भाजपच्या वरिष्ठांकडूनच अप्रत्यक्षपणे बळ देऊन फडणवीस यांच्याविरोधात सक्षम नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी (दि. १६) केला.
त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी शहराध्यक्ष गजानन थरकुडे, महिला शहराध्यक्षा पल्लवी सातपुते-जावळे, महेश मोगरे व निषाद पाटील उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, “नव्याने सत्तेत सहभागी झालेल्या छगन भुजबळ यांचे ईडीकडे जुने प्रकरण आहे. मात्र ईडीला हे प्रकरण आठवणार नाही. आता भाजपच्या स्वायत्त संस्था लगेच क्लीन चीट देत आहेत. राज्य सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’, महाआरोग्य शिबिरे यामध्ये मोठा गोंधळ आहे. आरोग्य विभागातील घोटाळा लवकरच उघडकीस आणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पितळ उघड करणार आहे.”
गोऱ्हेंचा एकतरी कार्यकर्ता दाखवा!
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना एकही कार्यकर्ता तयार करता आला नाही. तसेच त्यांनी सेनेची शाखादेखील उघडली नाही. तरीही उद्धव ठाकरे यांनी त्यांना ४ वेळा महत्त्वाची पदे दिली. त्यानंतरही त्या शिंदे गटात गेल्या. आता त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर चिखलफेक करत आहेत. हा प्रकार शिवसैनिक खपवून घेणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.