पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात मुख्य रस्त्यांवर चौकात फ्लेक्सबाजी केली जात आहे. ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ अशा आशयाचा मजकूर यावर असल्याने जोरदार चर्चा रंगत आहे. येथून भाजपने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली; तर महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाकडून अश्विनी कदम यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून आबा बागूल लढण्यास इच्छुक हाेते. पण, पक्षाकडून उमेदवारीच मिळाली नाही. अखेर त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सध्या ‘पर्वतीत यंदा सांगली पॅटर्न’ या प्लेक्सबाजीची चर्चा रंगत आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम, महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी माघार घेतल्याने लढत तिरंगी हाेणार असे तूर्त दिसत आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी २०१९ मध्ये ३६,७६७ मतांनी अश्विनी कदम यांचा पराभव केला होता. पण, आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीमध्ये पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी आबा बागुल प्रयत्नशील होते. पण, पर्वतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. महायुतीकडून भाजपने माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिल्याने माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले हे नाराज झाले होते. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. पण, भिमाले यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे माधुरी मिसाळ यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
असा होता "सांगली पॅटर्न"
सांगली पॅटर्न म्हणजे, निवडणुकीत बंडखोर उमेदवाराची विजयाची कामगिरी. सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे विशाल पाटील यांनी आपला पक्ष सोडून अपक्ष लढत विजय मिळवला होता. विशाल पाटील यांनी मिळवलेल्या ५ लाख ७२ हजार ६६६ मतांनी त्यांना विजय मिळवून दिला होता, ज्यात भाजपचे संजयकाका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील पराभूत झाले. सांगली पॅटर्नमुळे राज्याच्या राजकारणात एक नवा मुद्दा उदयास आला आणि आता पर्वती मतदारसंघात हा पॅटर्न येणार का, यावर चर्चा सुरू आहे. यावर काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल हे अपक्ष म्हणून पर्वती मतदार संघात रिंगणात उभे आहेत. यामुळे पुण्यात काँग्रेस चा कार्यकर्ता अपक्ष उमेदवार लढवून या ठिकाणी सांगली पॅटर्न राबवण्यात येत असल्याचे सांगत आहेत.