सांगवी : सांगवी (ता.बारामती) येथील आरोग्य केंद्र हे खासगी वाहनतळ बनले आहे. रुग्णवाहिकेची जागाच खासगी वाहनांनी घेतली आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बारामती-फलटण रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून थाटात व्यवसाय उभारले आहेत.
या ठिकाणी येणारे ग्राहक आरोग्य केंद्राच्या गेटसमोर पार्किंग करतात, तर गावातील व्यावसायिकांंचे तिथेच व्यवसाय असल्याने प्रवेशद्वाराच्या आत दिवस रात्र दुचाकी, चार चाकी टेम्पो पार्किंग करत असतात, यामुळे वारंवार आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्य केंद्र नक्की गावातील खासगी वाहने पार्किंग करण्यासाठीच आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. आरोग्य केंद्राच्या आतील भागातही वाहतूक व्यावसायिकांकडून चारचाकी वाहनांचे पार्किंग करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे गेटच्या आत रुग्णवाहिका लावण्याची जागाच खासगी वाहनांनी लुटली असल्याचे दिसून येत आहे. या पार्किंग केलेल्या वाहनांमुळे रुग्णवाहिका आरोग्य केंद्राच्या पाठीमागे पार्किंग करावी लागत आहे. मात्र एखादी रुग्णवाहिका तत्काळ प्रसूतीसाठी आलेली गरोदर माता किंवा इतर रुग्णाला आणण्यासाठी किंवा नेण्यासाठी जाताना या पार्किंग केलेल्या वाहनांमुळे मात्र मोठा अडसर निर्माण होतो. गावातील दांडग्यांंच्या गाड्या असल्याने आरोग्य केंद्रातील कर्मचारीही त्यांना तसे करण्यास प्रतिबंध करू शकत नाहीत. गाड्या पार्किंग करणाºया मालकाला सांगण्यास गेल्यास त्यांनाच धमक्या दिल्या जातात.गावपुढाºयांची नको तिथे कुजबूज...गावपुढारी, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून आरोग्य केंद्र स्वच्छ ठेवा, गोळ्या औषधे ठेवा, एखादा कर्मचारी कुठे गेला, डॉक्टर कधी येणार याच्यावर जोर देत आहेत, मात्र आरोग्य केंद्रात गावातील धनदांडग्यांंच्या वाहनांच्या पार्किंगमुळे होणारा त्रास सर्वांना माहीत असूनही यावर मात्र बोलणे टाळले जात आहे. याचा फटका आरोग्य कर्मचारी व सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.