लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत इंदापूर पंचायत समितीच्या सर्व कर्मचारी यांनी या स्वच्छता अभियानात सहभागी होत इंदापूर पंचायत समितीचा परिसर चकाचक करून घेतला, अशी माहिती इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषद पुणे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, तसेच स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) यांच्यावतीने स्वच्छ सुंदर पुणे जिल्हा महा स्वच्छता महाश्रमदान गुरुवार (दि. १६ सप्टेंबर २०२१) रोजी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पंचायत समितीच्या सर्वच शाखेतील कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका कृषी संपन्न म्हणून नावाजलेला आहे. तसेच स्वच्छतेबाबतीतही संपूर्ण जिल्ह्यात इंदापूर तालुका अव्वल येण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा मोठा सहभाग असणार असून, ग्रामपंचायत स्तरावर मोठे काम सुरू केले आहे. त्यामुळे इंदापूर तालुका लवकरच स्वच्छ, सुंदर व हरित होईल. इंदापूर तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविले आहे. यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी होणे आवश्यक आहे.
चौकट : झगडेवाडी गाव आदर्श गाव करून दाखविणार
झगडेवाडी या गावात स्वच्छता अभियानावेळी, गावच्या आदर्श सरपंच रूपाली झगडे म्हणाल्या की, गावात सामुदायिक श्रमदान, शोषखड्डा निर्मिती, भिंतींवर स्वच्छताविषयक घोषवाक्य, सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवर स्वच्छतेविषयीचे संदेश लिहिणे, शाळा व अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा करणे, सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करणे, आदी कार्यक्रम हाती घेण्यात आले असून, झगडेवाडी गाव स्वच्छ करण्याच्या उद्देशाने गावातील नागरिकांनी हातात झाडू घेतला आहे. तसेच पुणे परिषदेत झगडेवाडी गाव आदर्श कसे ठरेल यासाठी ग्रामपंचायत व सर्वच नागरिक या अभियानात सहभागी झाले आहेत.
फोटो ओळ : इंदापूर पंचायत समितीच्या परिसरात स्वच्छता करताना कर्मचारी व अधिकारी.