इंदापूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेला देश पातळीवर सलग चौथ्या वर्षी मानांकन मिळूनच, याही वर्षी ओडीएफ पुष्टीकरण झाले. यामध्ये इंदापूर शहरातील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता उत्कृष्टपणे ठेवणाऱ्या सर्व स्वच्छता दूतांचा मोलाचा वाटा असून ते सन्मानास पात्र आहेत असे गौरव उद्गार नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी काढले.
इंदापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी आरोग्य मंदिरात ( सार्वजनिक शौचालयात ) नियमितपणे स्वच्छता ठेवणाऱ्या, स्वच्छता दूतांचा सन्मान नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते सोमवारी शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी स्वच्छता दूतांबरोबर नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सेल्फी घेतला. त्याच बरोबर इंदापूर बस स्थानकातील दुखन राम व संतोष ढावरे या कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व आय लव इंदापूर या सेल्फी पॉइंटला भेट देत सेल्फी घेतला.
यावेळी स्वच्छतादूत राहुल वाघेला, दिपक सोलंकी, रोहन चव्हाण, कुणाल चव्हाण, शैलेश सोलंकी, शितल वाघेला, तानसिंग सोलंकी, महावीर मिसाळ, दिनेश वाघेला आदी कर्मचाऱ्यांचा नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अंकिता शहा म्हणाले की, इंदापूर नगरपरिषदेस मानांकन मिळाले आहे त्यामध्ये स्वच्छता दूतांचा मोलाचे योगदान असून, उन, वारा, पाऊसाचा विचार न करता शौचालयाची देखभाल केली. सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयाची तोडफोड होवू नये काळजी घेतली. त्यामुळे त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
स्वच्छतादूत शहराची जशी काळजी घेतात, तसेच स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आरोग्य व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी कोविड लस घेणे आवश्यक आहे. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण नोंदणी करून लस घ्यावी.
यावेळी नोडल ऑफिसर गोरक्षनाथ वायाळ, अविनाश बर्गे, मनोज बारटक्के, सहाय्यक आरोग्य निरीक्षक सुनिल लोहिरे, सहाय्यक पाणीपुरवठा पर्यवेक्षक सुरेश सोनवणे, दीपक शिंदे, अंबादास नाळे, धनाजी भोंग आदी उपस्थित होते.
१५ इंदापूर
इंदापूर येथे स्वच्छता दूतांचा सन्मान करताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मान्यवर