पुणे : पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये बसविलेले स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र सध्या बंद असून या यंत्रांमध्ये सॅनिटायझर भरण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. पालिकेत मोठ्या प्रमाणावर नागरिक त्यांच्या कामांकरिता येत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
महापालिकेने कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यानंतर शहरात सर्वत्र सॅनिटायझर कक्ष उभारले होते. यासोबतच पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये लाखो रुपयांचे सॅनिटायझर यंत्र बसविण्यात आले आहेत. सर्व पक्षीय गटनेते, आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त तसेच काही उपायुक्तांच्या कक्षाबाहेर ही यंत्र बसविण्यात आली आहेत. यासोबतच इमारतीमधील व्हरांडे आणि जिन्याजवळही ही यंत्र बसविण्यात आली आहेत. विद्युत कनेक्शन दिलेल्या या उपकरणांना सेन्सर असून त्याखाली हात धरला की लगेच सॅनिटायझर हातावर फवारले जाते.
या यंत्रातील सॅनिटायझर संपले की भरण्याची सुविधा आहे. परंतु, बहुतांश यंत्रणामधील सॅनिटायझर संपले असून ते पुन्हा भरण्यात आलेले नाही. केवळ अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेरील यंत्रांमध्ये मात्र नियमित सॅनिटायझर भरले जात आहे. परंतु, नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे.