लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : सणसर परिसरात नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबल्याने शेतीपिके अडचणीत आली आहेत. पाण्याचे आवर्तन सोडावे, या मागणीसाठी येथील शेतकरी आज रस्त्यावर उतरले. आवर्तन सोडावे, अखंडित वीजपुरवठा द्यावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज रास्ता रोेको आंदोलन केले.सणसर परिसरातील भूजलपातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या परिसरातील वितरीका क्र. ३६ ,३९ ला गेल्या ६५ दिवसांपासून पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतीपिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी शेतातील पिके जळून जात आहेत. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाल्याने नीरा डावा कालव्याच्या वितरिका क्रमांक ३६, ३९ ला लवकर पाणी सोडावे, अशी शेतकरी, ग्रामस्थांची मागणी आहे. सणसर व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने या दोन्ही वितरिकांना पाणी सोडावे, त्यासाठी अखंडित वीजपुरवठा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सणसर बंगला येथे पाटबंधारे प्रवेशद्वारासमारे आंदोलन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थांनी सहभाग घेतला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, प्रदीप निंबाळकर, सागर भोईटे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर, वसंत जगताप, आबासाहेब निंबाळकर, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, शरद कांबळे, सचिन सपकळ, अक्षय निंबाळकर, किरण गायकवाड, अमोल भोईटे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
सणसरला रास्ता रोको आंदोलन
By admin | Published: May 08, 2017 2:09 AM