पुणे - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत भाजपावर दबाव आणू पाहणाऱ्या संजय काकडे यांनी अखेर बंडाची तलवार म्यान केली आहे. निष्ठावंत काँग्रेसजनांनी ‘बाहेरच्या’ उमेदवारांविरोधात केलेल्या मोर्चेबांधणीमुळे काकडे यांना काँग्रेसचे दरवाजे बंद झाल्याचे सांगितले जात आहे. भाजपाने यापूर्वीच पुणे लोकसभेसाठी काकडे यांना स्पष्ट नकार सांगितला होता. काँग्रेसकडूनही उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानंतर काकडे यांनी भाजपासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.शुक्रवारी (दि.२२) मुंबईत भाजपामध्ये काही नेत्यांचे पक्षप्रवेश झाले. यावेळी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत काकडे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणार असल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले.काकडेंचे बंड थंड करण्यामागे पुण्यातल्या काँग्रेसजनांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले. काकडे यांच्यासंदर्भातले ‘मेसेज’ काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आले. एबी फॉर्म घेऊन हे उमेदवार गायब होऊ शकतात, या शब्दात काकडेंबद्दलचा अविश्वास व्यक्त करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक असलेल्या काकडेंची प्रतिमा चांगली नसल्याचे कळवण्यात आले. यासाठी काही बाबींचे संदर्भ देण्यात आले. काकडे यांना उमेदवारी दिल्यास गृहप्रकल्पाच्या मुद्यावरून त्यांच्याविरोधात प्रचार करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनीही नुकताच दिला होता.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी काकडे यांना ‘आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करा मग उमेदवारीचे बघू,’ अशी तंबी दिल्याचे सांगण्यात येते. राज्यातल्या काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याचा काकडेंचा प्रयत्न होता. परंतु, खरगेंच्या स्पष्ट भूमिकेमुळे काकडेंपुढच्या अडचणी वाढल्या.राज्यसभेची आणखी सव्वा वर्षांची खासदारकी शिल्लक असताना त्यावर पाणी सोडून पळत्याच्या पाठीमागे लागायचे का, याचा निर्णय त्यांना करायचा होता. मात्र, काँग्रेसनेही उमेदवारीबद्दल शब्द न दिल्यामुळे त्यांना आहे तिथे राहण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे काँग्रेसमधल्या सूत्रांनी स्पष्ट केले. पुण्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्ली दरबारी पुरवलेल्या माहितीमुळे काकडेंसाठी काँग्रेसचे दरवाजे बंद झाल्याचा दावा त्यांनी केला.गायकवाडांवरही फुली?काकडे यांच्याप्रमाणेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या विरोधातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे बाजू मांडली. गायकवाड यांच्या जाहीर भाषणाच्या जुन्या ‘क्लिप्स’ही श्रेष्ठींपर्यंत पोहचवण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
बंड झाले थंड : काँग्रेसजनांच्या एकीपुढे संजय काकडेंची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 3:34 AM