पुणे : पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेससोबत युती तोडायला हवी असे ते म्हणाले आहेत. विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे पुण्यातून अजून एक शिवसैनिक शिंदे गटात सामील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवतारे म्हणाले, शिवसेनेचं दुकान बंद करेल पण काँग्रेससोबत जाणार नाही हे बाळासाहेबांचं वक्तव्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊ नका अशी विनंती एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी उद्धवजींना केली होती. पण त्यांनी ऐकले नाही. अडीच वर्षे घुसमट होत होती, तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्ही सहन केला. पण आता एकनाथ शिंदेनी घेतलेली भूमिका संघटनेसाठी आहे. आम्हाला आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही. आमच्याच मुख्यमंत्र्यांविरोधात कसं बोलणार, आम्ही अब्रू झाकत होतो. आम्ही सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक असून महाविकास आघाडी बरोबर नाही. उद्धव ठाकरेंना आम्ही दिलेल्या पत्रातून सर्व व्यथा मांडल्या पण आमचे काम झाले नाही. आमचं एकच सांगणं आहे कि, महाविकास आघाडीतून बाहेर पडा अशी ते यावेळी म्हणाले आहेत.
56 वर्षाची शिवसेना संजय राऊत यांनी बारामतीच्या वळचणीला बांधली
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर विजय शिवतारे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, शिवसेनेवर आज जी काही वेळ आली आहे त्याला संजय राऊत जबाबदार आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही शिवसैनिकाला विचारले तरी तो हेच सांगेल. 56 वर्षाची शिवसेना संजय राऊत यांनी बारामतीच्या वळचणीला बांधली. असं आरोप त्यांनी यावेळी केला आहे.