पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतरही स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत शनिवारी शहरात दाखल होऊन मनोमीलनासाठी ‘शिष्टाई’चा प्रयत्न केला.
केंद्रात व राज्यात एकत्र सत्तेत असूनही शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. युती झाल्यानंतरही मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपाला सोडण्यात यावा, यासाठी लक्ष्मण जगताप यांच्यासह समर्थकांनी प्रयत्न केला. मात्र मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाऊन श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे लक्ष्मण जगताप आणि त्यांचे समर्थक बारणे यांच्या प्रचारात सक्रीय झालेले नाहीत. दोन दिवसांपूर्वी लोकलेखा समितीचे अँड सचिन पटवर्धन यांनी शिष्टाई करीत दोन्ही नेत्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. अखेर शिवसेनेचे नेते संजय राऊत शहरात दाखल झाले आणि त्यांनी जगताप आणि बारणे यांच्यात सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. दोघांशी संयुक्तपणे तसेच स्वतंत्र चर्चा केली. या वेळी आमदार जगताप यांचे म्हणणे राऊत यांनी एकून घेतले. त्यानंतर बारणे यांच्याशीही चर्चा केली. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार असून, या वेळी आमदार जगताप व श्रीरंग बारणे हे एकत्र येण्याची शक्यता आहे.