पुणे : कोवीड काळात बनावट पार्टनरशीप डिड तयार करुन त्याद्वारे पुण्यातील जंबो कोवीड सेंटर उभारण्याची निविदा मंजूर करुन घेऊन पीएमआरडीएची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे़.
याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजु ठाणगे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार डॉ. हेमंत गुप्ता, सुजीत पाटकर, संजय शहा, राजू साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलला पुण्यातील शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या कोवीड जंबो सेंटरचे कत्रांट दिले होते. वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निवीदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशीप डिड दाखल करुन ही निविदा मंजुर करुन पुणे महानगर विकास प्राधिकरणांची फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.