पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात थकीत वीजबिलांच्या वसुलीची स्थिती विदारक आहे.त्यामुळे सातत्याने वीज बिल थकीत ठेवण्याची मानसिकता बदलण्यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व वीज बील वसुलीची मोहीम आक्रमकपणे राबवा, असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले. महावितरणच्या प्रकाशभवनमध्ये गुरूवारी संजय ताकसांडे यांनी पुणे परिमंडलातील सुमारे दीड हजार अभियंते,अधिकारी व जनमित्रांशी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) शंकर तायडे, महाव्यवस्थापक अलोक गांगुर्डे,अधीक्षक अभियंते सुंदर लटपटे, पंकज तगलपल्लेवार, राजेंर्द्र पवार, उपमहाव्यवस्थापक एकनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.संजय ताकसांडे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून पुणे परिमंडलात थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र,त्यात सातत्य नसल्यामुळे थकबाकी वाढत आहे. त्यामुळे आर्थिक कोंडी वाढत चालली आहे. ही विदारक स्थिती बदलण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत महावितरणचा एक रुपयाही थकीत राहणार नाही या मानसिकतेतून संबंधितांनी काम करावे.तसेच संपूर्ण थकबाकी याच महिन्यात वसुल करावी,असे निर्देश त्यांनी दिले.वसुलीच्या कामात हेतुपुरस्सर निष्काळजीपणा करणा-या अधिकारी व कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली. सर्वच १२ विभागांचे अभियंते व जनमित्रांसोबत प्रादेशिक संचालक ताकसांडे यांनी विभागनिहाय स्वतंत्र बैठक घेतली व संवाद साधला. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार विजेचा अनधिकृत वापर करीत असल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करावी. पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ७ लाख ३ हजार थकबाकीदारांकडून १३३ कोटी ५२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे,असे या बैठकीत सांगण्यात आले.
थकीत वीजबिलांची वसुली मोहीम आक्रमकपणे राबवा : संजय ताकसांडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 6:59 PM
पुणे व पिंपरी शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील ७ लाख ३ हजार थकबाकीदारांकडून १३३ कोटी ५२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे
ठळक मुद्देगेल्या दोन वर्षांपासून पुणे परिमंडलात थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई सुरु थकबाकीदार विजेचा अनधिकृत वापर करीत असल्यास तात्काळ फौजदारी कारवाई