शेलपिंपळगाव : ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या ७२१ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात आळंदी यात्रेस ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. कार्तिक वद्य अष्टमीला (दि.११) सकाळी गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने या सोहळ्यास सुरुवात होणार असून, मुख्य पहाटपूजा १४ नोव्हेंबरला तर माऊलींचा संजीवन सोहळा १६ नोव्हेंबरला पार पडणार आहे.गुरुवारी (दि.९) व शुक्रवारी (दि.१०) कीर्तन, प्रवचन असा दैनंदिन कार्यक्रम मंदिरात होईल. शनिवारी (दि.११) कार्तिक वद्य अष्टमीला पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते सकाळी सात वाजता गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सोहळ्याची सुरुवात होणार आहे. मंगळवारी (दि. १४) कार्तिक वद्य एकादशीला मध्यरात्रीपासून संजीवन समाधीवर पवमानपूजा, दुग्धाभिषेक केला जाईल. पहाटपूजेनंतर भाविक भक्तांच्या महापूजा बंद ठेवण्यात येणार असून समाधी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर माऊलींची पालखी दुपारी एक वाजता नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडेल. संपूर्ण नगरप्रदक्षिणेनंतर पालखी रात्री आठ वाजता मंदिरात विसावल्यानंतर परंपरेनुसार मंदिर प्रदक्षिणा व त्यानंतर धुपारती घेण्यात येईल. बुधवारी (दि. १५) द्वादशीनिमित्त पहाटे चारच्या सुमारास खेड प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडेल. त्यानंतर साडेचार ते सकाळी साडेअकरापर्यंत भाविकांच्या महापूजा होतील.भक्तांची जमते मांदियाळी :अनुपम असा आनंदोत्सव!श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा अर्थात कार्तिकी उत्सव आठ ते नऊ दिवस चालणार आहे.संत नामदेव महाराजांच्या वंशजांच्या हस्ते माऊलींच्या समाधीची महापूजा होईल. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत वीणामंडपात माऊलींच्या समाधी प्रसंगाचे हरिकीर्तन होईल.दुपारी बारा वाजता घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती झाल्यानंतर संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होईल. समाधी दिनाच्या दिवशी गुरुवार असल्याने माउलींची पालखीची मंदिर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर आरफळकर यांच्या वतीने जागराचा कार्यक्रम होईल.
संजीवन समाधी सोहळा १६ नोव्हेंबरला; हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरुवात, लाखो वारक-यांनी अलंकापुरी गजबजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 6:07 AM