पुणे : गरीब रुग्णांना मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी अगोदर पैसे भरा; मगच उपचार सुरू होतील, एखादा रुग्ण मृत पावला, तर पैसे भरल्याशिवाय मृतदेहही दिला जात नाही, अशा अनेक तक्रारींवर प्रहार संघटनेची आरोग्य सेवा समिती राज्यभर काम करत आहे. त्यामुळे रुग्णांना संजीवनी मिळत असून, गरिबांसाठी तो एक आधार बनत आहे. या समितीकडे पुणे शहरातूनच दररोज दहा ते १२ रुग्णांच्या तक्रारी येत आहेत. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरिबांना उपचार मिळावेत, यासाठी काही बेड रिकामे ठेवणे बंधनकारक आहे. परंतु, त्या बेडची सेवा गरिबांना देताना मोठी रुग्णालये आडकाठी आणत आहेत. परिणामी, अनेक गरिबांना आपला जीव गमवावा लागत आहे. परंतु, या गरीब रुग्णांना आधार देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी नावाचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी राज्यात आरोग्य सेवा समिती स्थापन झालेली आहे. त्याद्वारे सुमारे ३० जण रुग्णांच्या हक्कासाठी लढत आहेत. या उपक्रमाबाबत पुण्यातील नयन पुजारी यांनी लोकमतला माहिती दिली. ते म्हणाले, सध्या गरिबांना मोठी रुग्णालये जुमानत नाहीत. खरंतर गरीब रुग्णांना त्यांचा उपचाराचा हक्क सरकारने दिलेला आहे. फुकटात उपचार देत असले, तरी सरकारकडून रुग्णालयांना त्याबदल्यात अनुदान मिळते. मग तरी अधिक पैसे कमविण्यासाठी मोठी रुग्णालये गरिबांना लुटत आहेत. शासकीय योजना आता बंद आहेत, तुम्हाला पैसे भरावेच लागतील, अशी दमदाटी अनेक रुग्णालये करीत आहेत. त्यामुळे रुग्ण आमच्याकडे येतात. तेव्हा आम्ही त्यांना संबंधित रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करतो.ह्णह्ण गरीब रुग्णांकडे पिवळे रेशनकार्ड असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल, तर त्यांना मोठ्या रुग्णालयात त्वरित उपचार देणे आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्तांकडून दिलेल्या पत्रांनाही ही रूग्णालये केराची टोपली दाखवतात. त्यामुळे बिचारे गरीब रूग्ण उपचारांविनाच आपला प्राण गमवतात. असे होऊ नये यासाठी आम्ही अनेक रूग्ण हक्क सेवक म्हणून काम करत आहोत. पुण्यात उमेश महाडिक, नौशाद शेख आणि अजून एक दोघांची टीम आहे. तर इतर जिल्ह्यात मिळून सुमारे ३० जण राज्यभर काम करतो, असे नयन पुजारी यांनी सांगितले. संजीवनी राबविण्यासाठी बाऊन्सरची मदत संजीवनी उपक्रम राबविण्यासाठी आम्ही देखील बाऊन्सर ठेवणे सुरू केले आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे. कारण कधी-कधी रूग्णालय प्रशासन दमदाटी करते. तेव्हा आम्हाला या बाऊन्सरचा उपयोग होतो. आमच्या टीममधील सर्वजण आपआपले व्यवसाय सांभाळून हे काम करत आहेत, असे पुजारी म्हणाले. ...................बिल कमी करून देणारे एजंटही वाढले सध्या अनेक रूग्णालयाबाहेर आणि धर्मादाय आयुक्तालयाच्या बाहेर रूग्णांचे बिल कमी करून देतो, असे म्हणणारे एजंटही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे अनेक रूग्ण फसवले जात आहेत, यावरही चाप बसणे आवश्यक असल्याचे पुजारी यांनी सांगितले.
राज्यात गरीब रुग्णांच्या हक्कासाठी ’संजीवनी’ ठरतेय आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 2:37 PM
धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरिबांना उपचार मिळावेत, यासाठी काही बेड रिकामे ठेवणे बंधनकारक आहे. परंतु, त्या बेडची सेवा गरिबांना देताना मोठी रुग्णालये आडकाठी आणत आहेत.
ठळक मुद्देराज्यभर ३० जणांची टीम; हजारो रुग्णांना दिलासा या समितीकडे पुणे शहरातूनच दररोज दहा ते १२ रुग्णांच्या तक्रारी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी नावाचा उपक्रम हातीसंजीवनी उपक्रम राबविण्यासाठी बाऊन्सर ठेवणे सुरू