रांजणगाव गणपती : राज्यात मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाल्यानंतर आलेली संकष्टी चतुर्थी व रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून रांजणगावच्या श्री महागणपतीचे भाविकांनी रांगेत मनोभावे दर्शन घेतले. संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री महागणपतीला १००१ डाळिंबाचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक व दु. १२ वा. महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. संकष्ट चतुर्थी निमित्त शेतकरी नानाभाऊ दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट व गणेश भक्त आणि कारेगाव ( ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप नवले यांच्या वतीने १ हजार १ डाळिंबाचा महानैवेद्य करण्यात आला.
तर महागणपती सेवा मंडळ यांच्या वतीने २५ किलो बर्फीचा नैवेद्य श्री महागणपतीला देण्यात आला. संकष्टी चतुर्थी व रविवारची सुट्टी विचारात घेऊन दर्शनासाठी येणारा भाविकांचा ओघ लक्षात घेऊन रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर दररोज मंदिर व परिसराची पूर्णपणे साफसफाई व सॅनेटायझेशन करण्यात येत असून भाविकांना मास्क बंधनकारक असल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले.