पुणे : किल्ले सिंहगडावर कोंढाणेश्वर मंदीरासमोरच्या समोरच असलेल्या एका खासगी गेस्ट हाऊस मध्ये रविवारी मध्यरात्री मांसाहार व दारू पार्टी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. येथे दारू व मांसाहारी पदार्थ आढळुन आले. रविवारी एका स्वच्छता मोहिमेसाठी रात्रीच मुक्कामी गेलेल्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांना येथे रात्री जोरदार आवाजात गप्पा मारत एकमेकांशी हुज्जत घालून चर्चा सुरू असल्याने काय गडबड आहे म्हणून काही शिवप्रेमी कार्यकर्ते चौकशी करण्यासाठी तेथे गेले असता या गेस्ट हाऊस मध्ये जवळपास वीस पंचवीस लोक होते व त्यातील काही लोक दारू पित गोंधळ घालत असल्याचे दिसून आले. मांसाहारी पदार्थ सुद्धा त्यांच्या जवळ होते. कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता आम्ही गेस्ट हाऊस मालकाची परवानगी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी स्थानिक वायरलेस विभागाचे गडावरील पोलिसांचे हे निदर्शनास आणून दिले. तेथुन हवेली पोलिसांना कळविले. मद्यपान करणारे काही लोक व काही कार्यकर्ते हवेली पोलीस चौकीत गेले होते.याबाबत वन विभागाचे उपवन संंरक्षक सत्यजित गुजर यांनी सांगितले की, या प्रकाराची माहिती मिळाल्यावर आम्ही हवेली पोलिसांना घेऊन गडावर गेलो होतो़ त्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते़ (प्रतिनिधी)
सिंहगडावर मांसाहार, दारूची पार्टी
By admin | Published: March 22, 2017 3:24 AM