जैन धर्माचे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महामानव होते. त्यांनी २६०० वर्षांपूर्वी ही सार्वत्रिक कल्पना दिली होती की, या जगातील प्रत्येक आत्मा समान आहे आणि जो त्याची आंतरिक शक्ती जाणून घेऊन जागृत होतो तो परमात्मा बनू शकतो. ते कर्मविज्ञानाचे प्रवर्तक होते. त्यांनी सांगितले की, तुमचे खरे जग तुमच्यामध्ये आहे, जर तुम्हाला जग बदलायचे असेल तर स्वतःला बदला. हे जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. एका झाडाची ब्लूप्रिंट त्याच्या बीजामध्ये असते. त्याचप्रकारे आपण अनुभवत असलेल्या बाह्य घटनांची ब्लूप्रिंट आपल्या आतमध्ये असते. त्यालाच कर्म म्हणतात. कर्माचा स्वभाव आत्म्याच्या सामर्थ्यावर परिणाम करणे आहे. त्या कर्माला निष्फळ होण्यास धर्म मदत करू शकतो. त्यांनी धर्माची वैज्ञानिक व्याख्या ‘वत्थुसहावो धम्मो’ अशी प्रस्तुत केली. कोणत्याही पदार्थाचे आपल्या मूळ स्वभावामध्ये असणे हा त्याचा धर्म आहे. धर्माला व्यवहाराचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी संघटना स्थापन केली त्यालाच जैन धार्मिक भाषेत ‘संघ’ म्हटले जाते. आपल्या जिवंत आचरणाच्या माध्यमातून दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी दुःख सहन करण्याचा आदर्श त्यांनी प्रस्तुत केला. यासाठी जग त्यांचे सदैव ऋणी राहील.
- गणिवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज