आचारात अहिंसा आणि विचारात अनेकांतवाद ही जैन धर्माच्या रथाची दोन चाके आहेत. अहिंसा व्यावहारिक जगातील संघर्षाचे निराकरण करते, तर अनेकांतवाद वैचारिक संघर्षाचे निराकरण करते. या दोन्ही गोष्टी जगभरात एक मोठी समस्या म्हणून उभ्या आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर जागतिक स्तरावर आज जेवढ्या समस्या आहेत, त्यांना सोडविण्यासाठी या दोन्ही सिद्धांतांची प्राथमिकताच कामास येईल.
भगवान महावीरांनी जगातील सर्व दुःखांच्या कारणांना आत्मा आणि मनाच्या परिधीमध्ये पाहिले. तसेच दु:खाच्या अंतहीन शृंखलेचे कारणही शोधले. एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत अशा प्रकारे दुःख निरंतर का चालते. याचा सखोल विचार करून, निष्कर्षामध्ये त्यांनी कर्मसिद्धांत स्पष्ट केला.
त्यामुळेच असे म्हटले जाते की, जैन तत्वज्ञानाचा केंद्रीय सिद्धांत शाब्दिक दृष्टिकोनापेक्षा अर्थामध्ये अधिक विशाल आहे आणि त्याच्या व्यापकतेमध्ये केवळ, प्राणिमात्रांच्या उत्कर्षासाठी करुणा आहे.
जहाल अशा चंडकौशिक सापाच्या हिंसेला महावीरांनी अहिंसेमध्ये परिवर्तित केले. अग्नीने अग्नी विझत नाही त्याचप्रमाणे हिंसेचे उत्तर हिंसा नाही, या शिकवणूकीवर त्यांचा भर होता.
- आचार्य हिराचंद्रजी महाराज