पुणे : जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कारांची शिदोरी आवश्यक आहे. आईवडील, गुरुजनांचा आदर करा, शिका, खूप मोठे व्हा आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करा, असा कानमंत्र माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.उपेक्षित मुलांबरोबर संवाद साधताना त्या बोलत होत्या. अनाथ, दिव्यांग, मुले-मुली माजी राष्ट्रपतींच्या सहवासाने हरखून गेली होती. कमल फाउंडेशनतर्फे डॉ. महावीर खोत, डॉ. भाग्यश्री खोत, शिक्षिका राखी रासकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ समाजसेविका श्यामला देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या शाळा, साई मतिमंद विद्यालय, अंधशाळा; तसेच एड्सग्रस्त मुलांनाही माजी राष्ट्रपतींना त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानी भेटण्याची संधी मिळाली. या वेळी फाउंडेशनतर्फे सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य, मिठाई व फळांचे वाटप करण्यात आले. मुलींनी सादर केलेली गीते, कविता यांचे पाटील यांनी विशेष कौतुक केले. मनपा शाळा क्र. ११५ हिंगणे येथील मुलींनी आईवरील केलेल्या ‘मातृवंदना’ पुस्तिकेचे अवलोकन करून मुलींना शाबासकी दिली. या वेळी ज्येष्ठ विधी सल्लागार प्रभाकर गोरले, साई संस्थेच्या कल्पना कर्पे, पुणे अंधशाळेच्या अर्चना सरनोबत आणि सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई व शिवाजी हुलावळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संस्कारांची शिदोरी आवश्यक
By admin | Published: November 18, 2016 4:52 AM