संस्कृतने कॅलिफोर्नियात मला घर मिळवून दिलेपुणे : आता येतोय, नूमविचा माजी विद्यार्थी नासातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. आझम थत्ते, अशी वाक्ये उच्चारताच सगळ्यांच्या नजरा या नावाकडे वळल्या... छत्तीस वर्षांचा एक गोरागोमटा... गालावर खळी असलेला एक तरुण व्यासपीठावर आला... अमेरिकेत वास्तव्यास असलेला आणि एका ग्रहाचा शोध लावलेला हा शास्त्रज्ञ आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे, हे कळल्यावर नूमविच्या शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला.चौदा वर्षे परदेशात राहिल्यामुळे इंग्रजीमधून संवाद साधेल, असे वाटत असताना एका वृत्तपत्रात वाचून मी पत्नीसह आज या मेळाव्याला आलो आहे..., असे सांगत अस्खलित मराठीमध्ये त्याने बोलायला सुरुवात केली आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला... मातृभाषेतले शिक्षण आजही मला भावते... इंग्लिश, फ्रेंच अनेक भाषा शिकलो, या भाषेतले साहित्यही वाचले, पण विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्या कविता त्यांच्यासारखे साहित्य कुठेच वाचायला मिळाले नाही, असे सांगताच ‘तो आला, त्याने पाहिले आणि जिंकले,’ अशीच सर्वांची भावना झाली... आम्ही नूमविय महामेळाव्याचा तोच खरा ‘हिरो’ ठरला! आझमने ग्रह आणि ताऱ्याचे अंतर शोधण्याची ‘अल्गोरिदम’ संशोधन पद्धती शोधून काढली. ग्रहावर खनिजे, मिथेन आहे ते या अल्गोरिदममधून कळू शकते.
(प्रतिनिधी) ग्रह आणि ताऱ्याचे निरीक्षण करताना त्याने एचडी १८९७३३ या ग्रहाचा शोध लावला. ही त्याची उत्तुंग कामगिरी ऐकून सर्व जण भारावून गेले. कॅलिफोर्नियात भाड्याचे घर मिळविताना आलेला अनुभव त्याने कथन केला, एका अमेरिकन बाईचे भाड्याचे घर पाहायला गेलो, पण ती खूपच आढेवेढे घेत होती. संस्कृत भाषेविषयी तिला विशेष आपुलकी होती. तुला येते का संस्कृत? असे तिने मला विचारले आणि माझ्या डोळ्यासमोर आठवीमध्ये संस्कृतच्या बार्इंनी शिकविलेले सुभाषित आठवले, ते कसे म्हटले याचे प्रात्यक्षिक त्याने दाखविले. हे सुभाषित ऐकून त्या अमेरिकन बाईच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने घराच्या चाव्या माझ्या हातात दिल्या... संस्कृत भाषेने मला घर मिळवून दिले, असे त्याने अभिमानाने सांगितले.