पिंपरी : संस्कृत भाषेचे सौंदर्य महान आहे. प्राचीन काळातील सर्व धर्मग्रंथ याच भाषेतून लिहिले गेले. दुर्दैवाने पाश्चिमात्य संस्कारामुळे संस्कृत भाषा मृतवत झाली आहे. त्यामुळे सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेला राजभाषाच नव्हे, तर विश्वभाषा होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले.संस्कृत भाषेच्या रक्षणाचे काम करणाऱ्या संस्कृत भारती या संघटनेच्या वतीने आळंदी येथे दोन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी खासदार साबळे बोलत होते. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद जोशी, संस्कृत भारतीचे अध्यक्ष डॉ. अनंत धर्माधिकारी आणि संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री डॉ. दिनेश कामत आदी उपस्थित होते.खासदार साबळे म्हणाले, ‘‘संस्कृत भाषा देशाची राजभाषा व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वेळी मागणी केली होती. या शिवाय त्या वेळी देशाच्या पाच प्रांतांतील तज्ज्ञ विद्वानांनीही संस्कृत ही देशाची राजभाषा व्हावी, अशी मागणी केली होती. संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास वाचतो तसाच त्यांचे भाषाप्रभुत्वही होते. संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेतून बुद्धभूषण शासन प्रणाली लिहिली होती. (प्रतिनिधी)
संस्कृत भाषा झाली मृतवत
By admin | Published: November 25, 2015 12:36 AM