पाठशाळेच्या अध्यक्षा डॉ. सरोजा भाटे यांनी सांगितले की, यातील पहिले पाऊल म्हणून संस्कृत व्याकरणाच्या लघुसिद्धात्नकौमुदी या ग्रंथाचा पारंपरिक पद्धतीचा ऑनलाईन वर्ग दररोज सकाळी साडेसहा ते आठ या वेळेत सुरू करण्यात आला. डॉ. रोहन कुलकर्णी अध्यापनाचे काम करत असून वैष्णवी जोशी, वेदिका व्यवहारे आणि अक्षय सावईकर विद्यार्थ्यांची उजळणी घेत आहेत. या वर्गासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असून लवकरच यांच्यासाठी दोन स्वतंत्र वर्ग सुरू केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे किमान वय चौदा वर्षे असणे आवश्यक आहे.
हे वर्ग पूर्णपणे नि:शुल्क आहेत. त्यामुळे अध्यापकांचे मानधन, शिष्यवृत्ती, तांत्रिक बाबींसाठी पर्याप्त आर्थिक तरतूद होणे आवश्यक आहे. हा ज्ञानयज्ञ दीर्घ काळ चालावा, त्याचा विस्तार व्हावा यासाठी दानशूर व्यक्तींनी देणगी द्यावी असे आवाहन भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत सुधीर वैशंपायन यांच्याशी संपर्क साधावा.