संस्कृत भाषेला सर्व भारतीय भाषांची जननी, देवभाषा, अमृतवाणी असे संबोधले जाते. संस्कृत ही विशिष्ट कोणा एका वर्गाची मक्तेदारी नसून कोणताही जिज्ञासू अभ्यासक लिंग, जात, वर्ण या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन ही भाषा शिकू शकतो. ज्ञानभाषा म्हणून संस्कृत भाषेचे स्थान इंग्रजीइतकेच महत्त्वाचे आहे. एखाद्या युवकाला किंवा युवतीला या भाषेचा अभ्यास करून काही करिअर करायचे असल्यास अनेक क्षेत्रांत काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकतात.
अध्यापन- संस्कृत भाषेचे अध्ययन करून शालेय, महाविद्यालयीन तसेंच विद्यापीठपातळीवर अध्यापनाची संधी उपलब्ध होऊ शकते. उत्तम शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आवश्यक अशा बी.एड्,एम.एड्. सारख्या पदव्या.अध्यापनाकरिता सेट -नेट परीक्षा उत्तीर्ण होणे या संधी करिता आवश्यक आहे.
संशोधन-अध्यापनाबरोबरच संशोधनातही संस्कृत अभ्यासकांना संधी उपलब्ध होऊ शकते. विविध पातळ्यांवर चरित्रकोश, शब्दकोश आदी संपादित करणे विविध संशोधन केंद्रातील प्रकल्पांकरिता नोंदी लिहिणे, संदर्भ शोधणे, प्रकल्पाचा वृत्तांत तयार करणे आदी विविध संधी अभ्यासकांना प्राप्त होऊ शकतात.
प्रसारमाध्यम-विविध पौराणिक कथा, त्यांची कालसुसंगतता याविषयी अभ्यासपूर्ण लेख प्रसारमाध्यमांच्या मदतीने प्रकाशित करणे, प्राचीन कलाकृतींचे आधुनिक परिप्रेक्ष्यातून सादरीकरण करणे, असे नवनवीन प्रयोगही संस्कृताध्ययनाने शक्य आहेत. विविध प्राचीन ऐतिहासिक घटनांवर आधारित मालिकांकरिता आशयघन संदर्भ शोधणारे संशोधक व लेखक वेगवेगळ्या वाहिन्यांना हवे असतात. ज्यांना ‘कंटेंट रायटर’ असे म्हणतात अशा प्रकारची सर्जनशील व नावीन्यपूर्ण संधीही संस्कृतचा निगुतीने अभ्यास केल्यास प्राप्त होऊ शकते.
व्यक्तिगत व्यवसाय-प्रत्येक वेळेला विशिष्ट कालबंधन पाळून कोणत्या संस्थेशी बांधिलकी ठेवून नोकरी किंवा प्रकल्पात काम करणे शक्य होतेच, असे नाही.अशा परिस्थितीत घरच्या घरी अगदी बालवगार्पासून ते ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील लोकांना उपयोगी असे उपक्रम आपल्या वेळेनुसार सुरू करता येऊ शकतात.
हस्तलिखितशास्त्र अध्ययन- भारतात अतिशय समृद्ध असा ज्ञानठेवा संस्कृत भाषेत निर्माण झाला आहे. आजही कित्येक अप्रकाशित अशी हस्तलिखिते जगभर उपलब्ध आहेत. त्यातील ज्ञान प्रकाशित करता यावे म्हणून संस्कृतबरोबरच प्राचीन लिपी तसेच हस्तलिखित शास्त्रांविषयीचे ज्ञान संपादित करून प्राचीन अप्रकाशित वाङ्मयाचा मागोवा घेणे हाही एक वेगळा अध्ययन आयाम ठरेल.
आंतरविद्याशाखीय अध्ययन-नवीन शैक्षणिक धोरणानुसार आंतरविद्याशाखीय अध्ययनाला महत्त्व येत आहे. या दृष्टीने संस्कृत व त्याबरोबर आयुर्वेद, कृषिशास्त्र, भारतीय विद्या व पुरातत्त्व विद्या, प्राचीन इतिहास व संस्कृती, सादरीकरण कला, कीर्तनकला, विविध शास्त्रे यांचे आंतरविद्याशाखीय अध्ययन. तसेच पाली व प्राकृत या प्राचीन भाषांचे अध्ययन, संस्कृतशी समांतर अशा जैन व बौद्ध वाङ्मयाचे अध्ययन यांच्या एकत्रित अभ्यासाने विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.
मुद्रितशोधन-कोणतेही साहित्य प्रकाशित करताना त्या साहित्याचे मुद्रितशोधन म्हणजे प्रूफ रीडिंग अतिशय महत्त्वाचे असते. या संदर्भातही संस्कृत व मराठी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या अभ्यासकांना विपुल प्रमाणात संधी उपलब्ध होऊ शकतात.
इंग्रजी ही परकीय भाषा असली तरी ती जागतिकीकरणाच्या काळात अस्खलित बोलता आली नाही तर प्रत्येकाला लाज वाटते. पण आपल्या आईप्रमाणे असणारी मातृभाषा मराठी व तिचा उगम ज्या भाषेतून झाला ती संस्कृत ही मला येत नाही हे सांगताना आपल्याला हळहळ वाटते का? हा आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे.
- डॉ. भारती बालटे, संस्कृत विभागप्रमुख, स. प. महाविद्यालय, पुणे