येरवडा (पुणे): मार्केट यार्ड येथून रस्ता चुकलेल्या तेरा वर्षाच्या मुलीला वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात यश आले. कोरेगाव पार्क वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रस्ता चुकलेल्या मुलीला पालकांचा तात्काळ शोध घेऊन मदत केली.
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंदाजे १२ वर्षाची एक लहान मुलगी सर्किट हाऊस चौकात घाबरलेल्या स्थितीत उभी होती. यावेळी कोरेगाव पार्क वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके व पोलिस अंमलदार यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने संस्कृती प्रकाश गोठे ( वय १२ रा. आनंदनगर झोपडपट्टी, गंगाधाम चौक, मार्केट यार्ड) असे स्वतःचे नाव व पत्ता सांगितला. घाबरलेल्या संस्कृतीला धीर देऊन विचारपूस करत पूर्ण माहिती घेतल्यावर तत्काळ सापडलेल्या मुलीची माहिती वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली.
कोरेगाव पार्क वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस अंमलदार यांनी सापडलेल्या मुलीची माहिती मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथील पोलिसांना दिली. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भाऊ तनपुरे यांनी तत्काळ मुलीच्या घरी जाऊन पालकांचा शोध घेऊन मुलगी कोरेगाव पार्क वाहतूक विभाग या ठिकाणी असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिच्या आजी कविता गोठे यांनी कोरेगाव पार्क वाहतूक विभाग येथे येऊन स्वतःच्या नातीला ताब्यात घेतले.
वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके, हवालदार रमजान खान, नाईक नवनाथ मोहिते, महिला शिपाई सविता रोकडे यांनी तात्काळ दाखवलेल्या सतर्कतेमुळे हरविलेल्या नातीला आजीपर्यंत पोहोचविण्यास मोठी मदत झाली. या घटनेमुळे सुरुवातीला लहान मुलगी देखील घाबरलेली होती. पोलीस काकांनी तिला धीर देऊन आजी येईपर्यंत तिची काळजी घेतली. रस्ता चुकलेल्या मुलीला सुखरूप ताब्यात दिल्याबद्दल गोठे कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.