पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बुधवारी (दि.२२) शहरात दाखल होत असून, या दोन्ही पालख्यांचे स्वागत महापालिकेकडून तीन ठिकाणी करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे यांच्याकडून पुष्पहार अर्पण करून या पालख्यांचे स्वागत होईल.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदीहून महापालिका हद्दीत कळस येथे सकाळी ११ वाजता प्रवेश करेल. येथे महापालिकेकडून प्रथम पालखी सोहळ्याचे स्वागत होणार आहे. तर श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दुपारी १ वाजता बोपोडी येथे प्रवेश करीत असून येथेही महापालिकेच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत होणार आहे.
या दोन्ही पालख्या पाटील इस्टेट येथे एकत्र होत असल्याने या ठिकाणी महापालिकेच्या वतीने दोन्ही पालखी सोहळ्याचे व दिंडी प्रमुखांचे पुष्पहार देऊन स्वागत केले जाणार आहे.
पालखी मार्गावर २१ ठिकाणी वैद्यकीय सुविधा
दोन्ही पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून २१ ठिकाणी वैद्यकीय सुविधा केंद्र उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी वैद्यकीय तपासणीसोबतच, मोफत औषधेही दिली जाणार आहेत.