आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी पायीवारी (Ashadhi Wari) पालखी सोहळ्याने रविवारी (दि.३०) सकाळी सहाला लाखो वैष्णवांसह आजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला. प्रस्थानपूर्वी मध्यरात्री माउलींच्या आजोळी पादुकांना रुद्राभिषेक करून पंचामृत पूजा, पंच्चपक्व्वान्न नैवद्य, आरती, पसायदान घेण्यात आले. (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi)
संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा !! जावे पंढरीशी आवड मनाशी ! कधी एकादशी आषाढीई !! तुका म्हणे एशे आर्त ज्यांचे मनी ! त्यांचे चक्री पाणी वाट पाहे !! अशाच पद्धतीची भावना अलंकापुरीत दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांमध्ये दिसून येत होती. शनिवारी रात्री उशिरा अजोळघरात विसावलेल्या या सोहळ्यात माउलींच्या पादुकांचे लाखो वारकऱ्यांनी सहज व सुलभ दर्शन घेतले. तत्पर्वी शनिवारी (दि.२९) सायंकाळी सातच्या सुमारास पालखीने मंदिरातून प्रस्थान ठेवले. मानकरी व ग्रामस्थांच्या खांद्यावरील मंदिर प्रदक्षिणा व प्रथेप्रमाणे चक्रांकित महाराजांच्या पूजेनंतर सोहळा पहिल्या मुक्कामी नवीन दर्शनबारी मंडपात (आजोळी) विसावला होता. प्रस्थान सोहळ्यादरम्यान बंद केलेली दर्शनरांग प्रस्थानानंतर मोठ्या गतीने नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शन मंडपात दर्शनासाठी आत घेण्यात येत होती. माउलींच्या दर्शनसाठी दिवसभर लांबच - लांब रांगा लागलेल्या असतानाही रात्री प्रस्थान सोहळ्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा वाढत होत्या.
धन्य आज संत दर्शनाचा ! अनंत जन्मीचा शिण गेला !! मज वाटे त्यांशी अलीगन द्यावे ! कदा न सोडावे चरण त्यांचे !! या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकरी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी कासावीस होऊन त्यांच्या चरणावर माथा ठेकून स्वता:ला धन्य करून घेत होता. संपूर्ण अलंकापुरी चैतन्यमय, धार्मिक वातावरणात दंग झाली होती. रविवारी पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माउलींच्या पालखीला नैवद्य दाखविण्यात आला. सहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व अजोळघरी आणून त्यांना मानपान देण्यात आले. त्यानंतर माउलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आली. वाजत - गाजत हा पालखी सोहळा पुढे धाकट्या पादुका व नंतर साईमंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावला. थोरल्या पादुका मंदिरात अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. आरतीनंतर साडेनऊच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. नवमी व दशमीला हा सोहळा पुण्यात भवानी पेठ, तर एकादशी व बारशीला सासवडनगरीत मुक्काम करणार आहे. दरम्यान केंदूर (ता.शिरूर) येथील श्री. संतश्रेष्ठ कान्होराज महाराजांची पालखी सकाळी सहाला पुण्याकडे मार्गस्थ झाली.
आषाढी वारीच्या पहिल्या मुक्कामानंतर हा सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. पुढील ३६ दिवस माऊली अलंकापुरीत नसणार या दुखी भावनेने आळंदीतील ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते. एखाद्या तान्हुल्या लेकराची स्वतःच्या आईपासून ताटातूट व्हावी, तशीच अवस्था येथील नागरिकांची होत होती. अलंकापुरीतील तरुण, तरुणी, वृद्ध असे हजारो भक्त माऊलींना निरोप सोडविण्यासाठी साईबाबा मंदिरापर्यंत आले होते.