पुणे: माउलींच्या दर्शनासाठी भाविक आसुसलेले असतातच; पण त्यांच्या रथाची सजावटही तितकीच लोभस आणि नयनरम्य असते. आळंदीतील गरुड कुटुंबीय गेली ४० वर्षे हा रथ आकर्षक फुलांनी सजवीत आहेत. गेली दोन वर्षे माउलींच्या वेगवेगळ्या नावे फुलांनी साकारण्यात आली होती. आता यंदा या रथावर संतांचे जीवनप्रसंग रेखाटण्यात आले आहे. यात १५ जीवन प्रसंगांचा समावेश आहे.
माउलींच्या रथाला सजविण्याचे काम ४० वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांनी सुरू केले. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी हे काम अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. माउलींच्या दर्शनाला होणारी गर्दी रथाचे मनमोहक रूप पाहून थक्क होतात. प्रदीप गरुड हे रथासाठी मार्केटयार्डातून फुले आणतात. प्रत्येकवेळी रथ सजविण्यासाठी सुमारे २५ ते ३० हजारांची फुले लागतात. त्यात जर्बेरा, ॲन्थुरियम, लिली, झेंडू, मोगरा कार्नेशन या फुलांचा वापर केला जातो. १२ ठिकाणच्या मुक्कामांसह एकूण १५ वेळा रथ सजविला जातो.
प्रस्थानावेळी महाद्वाराच्या सजावटीसह पादुकांना हार घालून रथाच्या सजावटीचे काम सुरू होते. त्यासाठी अनेक हात राबतात. त्यात अक्षय भोसले, कैलास आवटे, दशरथ गोडसे यांच्यासह अनेक जण सहभागी होतात. दरवर्षी फुलांची सजावट वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न असल्याचे गरुड सांगतात. गेली दोन वर्षे माउलींच्या विविध नावांना फुलांतून साकारण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र, यंदा काहीतरी वेगळे करावे, असे त्यांच्या मनात घोळत होते. त्यातूनच यंदा संताचे जीवनप्रसंग रथावर साकारण्याचे त्यांनी ठरविले. मात्र, हे शिवधनुष्य पेलता येईल का, असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. हा विचार त्यांनी मित्रांजवळ बोलूनही दाखवला. त्यांनी दिलेल्या पाठबळातून हे जीवनप्रसंग फुलांमधून उमटविण्याचे ठरविले.
माउलींची पालखी १२ ठिकाणी मुक्कामी राहिल्यानंतर त्यावर सजावट करण्याची संधी मिळते. त्यासाठी ते सर्व फुले पुण्यातील मार्केट यार्डातून आणतात. या १२ ठिकाणांसह आणखी ३ वेळा रथ सजविला जातो. अशा १५ वेळा रथावर आता माऊलींचा जीवनप्रसंग साकारण्यात येणार आहेत. त्यात प्रस्थानावेळी माउली ज्ञानेश्वरी लिहित असतानाचा प्रसंग रेखाटण्यात येणार आहे. तर निर्जीव भिंत चालविताना, रेड्यामुखी वेद बोलविणे अशा एकूण १५ प्रसंगांना रथावर स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना हे जीवनप्रसंग पुन्हा फुलांमधून अनुभवता येणार आहे.
माउलींच्या रथावर यंदा संतांचे जीवनप्रसंग साकारण्यात येणार आहे. यंदा रथ सजविण्याचे ४० वे वर्षे आहे. माउलींची सेवा करतोय, त्याला भाविकांची साथ मिळतेय. - प्रदीप गरुड, आळंदी