आळंदी : पावसाच्या सरी... टाळ - मृदंगाचा निनाद...."माउली - तुकारामांचा अखंड जयघोष... विविध वाद्यांचा गजर.... रांगोळीच्या पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी अशा चैतन्यपूर्ण वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी हजारो वैष्णवांच्या साक्षीने अलंकापुरीत विसावला. तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'श्रीं'ची भेट झाल्यामुळे आळंदीकरांचे तसेच भाविकांचे डोळे पाणावले.
माउलींची पालखी आळंदीच्या वेशीवर येण्यापूर्वी प्रथेपरंपरेनुसार चोपदारांकडून "सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी" या हरिपाठारावरील शेवटच्या अभंगावर सुरू असलेल्या चक्रांकित महाराजांच्या कीर्तनात माउलींची पालखी दाखल झाल्याची वर्दी देण्यात आली. चक्रांकित महाराजांच्या दिंडीने पालखीला सामोरे जाऊन पालखीचे स्वागत करून माउलींची आरती घेण्यात आली. त्यानंतर नगरपालिका चौक - श्रीविष्णू मंदिर - श्रीराम मंदिर - हरीहरेद्रस्वामी मठमार्गे पालखीने महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर विणा मंडपात पालखी स्थिरावली.
भाविकांची गर्दी...
माउलींना आळंदीत घेऊन येण्यासाठी भर पावसात स्थानिक नागरिक, ज्ञानेश्वर विद्यालयाचे तसेच शहरातील अन्य शाळांमधील विद्यार्थी व भाविकांनी थोरल्या व धाकट्या पादुका मंदिरस्थळी मोठी गर्दी केली होती. थोरल्या पादुका मंदिरात पहिला व धाकट्या पादुका स्थळावर दुसरा विसावा घेण्यात आला.