जेजुरी : पंढरीत आहे रखुमाई ,येथे म्हाळसा बानाई, तेथे विटेवरी उभा, इथे घोड्यावरी शोभा। तेथे पुंडलीकनिधान, इथे हेगडी प्रधान । तेथे बुक्क्याचे रे लेणे, इथे भंडार भूषणे । तेथे वाहे चंद्रभागा, इथे जटी वाहे गंगा । तेथे मृदंग वीणा टाळ, इथे वाघ्या मुरुळीचा घोळ ।अशा टाळ मृदंगाच्या तालात लोकप्रिय ओव्या गात वैष्णवांनी आज जेजुरीचा निरोप घेतला. सकाळी ७ वाजता हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा केल्यानंतर सोहळ्याने जेजुरी मुक्काम हलवून वाल्हेकडे प्रस्थान ठेवले. सकाळी साडे नऊ वाजता सोहळा सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील दौडज खिंडीत न्याहारीसाठी विसावला होता. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातून शेतकरी कुटुंबांची भाजी भाकर,आणि सामाजिक संस्थांकडून वाटप करन्यात आलेले न्याहारीचे पदार्थांवर कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ।लसूण मिरची कोथंबीरी, अवघी व्यापिली पंढरी । या संत सावतामाळी यांच्या अभंगातील ओव्या गात वैष्णवांनी ताव मारला. संपूर्ण डोंगर परिसरात ठिकठिकाणी विसावलेले वैष्णवांचे जथ्थे हे दृश्य अत्यंत नयनरम्य दिसत होते. तासाभराचा न्याहारीचा विसावा उरकून सोहळ्याने वाल्हेकडे कूच केले.
Ashadhi Wari: ज्ञानोबांनी घेतला खंडेरायाचा निरोप; लाखो वैष्णव अन् माऊलींचे वाल्हेकडे प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 4:01 PM