सासवड (पुणे) : आषाढी वारीने पंढरीला निघालेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा सासवड येथे दोन दिवस मुक्काम होता. पहाटेपासूनच वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर व सोपानदेव यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. श्री संत सोपानकाका व चांगावटेश्वर या दोन्ही पालखी सोहळ्यांचे प्रस्थान असल्याने आणि त्यातच माऊली सासवड मुक्कामी असल्याने आज त्रिवेणी संत दर्शनाचा लाभ वारकऱ्यांनी घेतला.
सासवड मुक्कामी माऊलींच्या भक्तांनी ज्ञानेश्वर माऊली व सोपानकाका महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. ‘निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम’चा घोष सुरू होता. गुरूवारी (दि. १५) सकाळी ही रांग लांबवर पोहोचली होती. माऊलींच्या दर्शनासाठी सुमारे दोन किलोमीटरची रांग लागली होती.
सोपानकाका महाराज ब्रह्मदेव आहेत, असा उल्लेख नामदेव महाराजांनी सोपानकाकांच्या समाधी वर्णन अभंगात केला आहे. आपल्या बंधूंच्या समाधीस्थळाला भेट द्यायला गुरूबंधू माऊली आले होते. संतांच्या सर्व पालख्या पुढे पंढरीत, वाखरीत भेटतात. मात्र, तरीही सोपानकाकांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी माऊलींची पालखी येथे येते. माऊली दोन दिवस थांबतात, अशी वैष्णवांची श्रद्धा आहे.
सासवडला दि. १४ व १५ जून रोजी दोन दिवसांचा मुक्काम असल्याने अवघे सासवड माऊलीमय झाले होते. ठिकठिकाणी वैष्णवांचे भजन, कीर्तन सुरू होते. दि. १४ जून रोजी योगिनी एकादशी असल्याने व दि. १५ रोजी बारस म्हणजेच एकादशीचा उपवास सोडायचा असल्याने अनेक तंबूंतून जेवणाचे पदार्थ बनविण्याची रेलचेल चालू होती. दि. १५ जून (गुरूवार) हा पूर्ण विश्रांतीचा दिवस असल्याने दिवसभर तंबू, राहुट्या वैष्णवांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. हरिपाठ, कीर्तन, भजनाचे कार्यक्रम सर्व ठिकाणी सुरू होते.
पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा, भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी पोलिस बंदोबस्त मजबूत ठेवण्यात आला होता. पालखी तळावर मनोरा उभारण्यात येऊन त्यावरून २४ तास कडा पहारा देण्यात येत होता. त्याचप्रमाणे संपूर्ण पालखीतळ परिसर आणि शहरातही मोठा बंदोबस्त होता. संपूर्ण पालखी तळ आणि परिसरात उभ्या करण्यात आलेल्या राहुट्या यामुळे एक वेगळे चित्र दिसत होते. पालांमधून वारकरी दिवस-रात्र कीर्तन, भजन करत विठुरायाच्या भक्तीमध्ये लीन झाले होते.
दरम्यान आज, शुक्रवारी (दि. १६) सकाळी ६ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दोन दिवसांच्या मुक्कामानंतर खंडेरायाच्या जेजुरीकडे मुक्कामासाठी प्रस्थान होईल. सासवड नगरपालिका तसेच सासवड नगरीतील ग्रामस्थांतर्फे माऊलींच्या पालखी सोहळ्याला यावेळी निरोप देण्यात येईल.