हडपसर : टाळ-मृदंगाच्या तालावर, भजनात दंग वारकऱ्यांची पावले. "ज्ञानोबा माऊलीचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात पुण्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज हडपसरमधून सासवडकडे तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने लोणी काळभोरकडे प्रस्थान केले.
वैदुवाडी मगरपट्टा येथे दुरून दिसणारा माऊली व तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचा कळस पाहताच भाविक नतमस्तक झाले. विसावा स्थळी रांगोळ्याच्या पायघड्या व फुलांच्या वर्षावाने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. हडपसरमध्ये दोन्ही पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. हडपसर मार्गावर वारकऱ्यांना फराळाचे वाटप केले.
पुण्यातून सकाळी ६ वाजता माऊलीच्या पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर सकाळी ८ वाजता शिंदे छत्रीता आरती झाली. सकाळी 8वाजून 50 मिनीटांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसरला पोहोचली, तर संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी 12 वाजता गाडीतळावरील विसावा ठिकाणी आली. सुमारे दीड तासाच्या विसाव्यानंतर ती लोणी काळभोरला रवाना झाली. केवळ ४५ मिनिटांचा विसावा घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडकडे मार्गस्थ झाली. पालख्यांपुढे नगारा, माऊलींचा अश्व व स्वाराचा अश्व पालखी स्थापुढे होता. खांद्यावर, पताका, डोक्यावर तुळसी वृंदावन, गळ्यात विना, मृदंग, कपाळी चंदनाचा टिळा,मुखी ज्ञानोबा-तुकोबाचा गजर, चेहऱ्यावर विठ्ठलाच्या भेटीची आस, आसमंतभर घुमणारा टाळ-मृदंगाचा नाद, असे रूप धारण केलेला वारकरी भक्तीमय वातावरणात आषाढी वारी सोहळा रंगला. ऱ्यावर खासदार अमोल कोल्हे ,आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर यांनी पालखीचे स्वागत केले.