पुणे : पुण्यात सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भुमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. गडकरींनी पुण्यातील विकासाबाबतच्या मुद्द्यावर भाष्य केले. पेट्रोल, मेट्रो अशा प्रकल्पनाचा उल्लेख करताना विविध विषयावर चर्चा केली. महाराष्ट्रात आषाढी वारीला खूपच महत्व आहे. संपूर्ण राज्यातून संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या भेटीला जात असतात. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखी महामार्गाबद्दल त्यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय.
गडकरी म्हणाले, संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पालखी मार्गावर १२ हजार कोटी खर्च करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कामाची आखणी, रस्ता बांधणी, खर्चाच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. अजित दादांशी बोलून तो कार्यक्रम कुठं घ्यायचा ते आम्ही ठरवणार आहोत. असंही ते म्हणाले आहेत.
''महाराष्ट्र राज्य विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर आहे. रस्ते, हायवे, मेट्रो, उड्डाणपुलासारखे प्रकल्प महाराष्ट्रात लवकरच पूर्ण होतील. राज्याला आपण सर्वानी मिळून देशात एक नंबरला घेऊन जायचं आहे असंही ते म्हणाले आहेत.''
नरीमन पॉइंट ते दिल्ली १२ तासांत
“अजित दादा, मी आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे बांधतोय. परवा मी त्याचं काम पाहिलं. एका ठिकाणी तो १२ लेन आहे. त्यावर १७० किमी स्पीडच्या गाडीत बसलो होतो. पण पोटातलं पाणी हललं नाही. त्याचं ७० टक्के काम झालं आहे. फक्त महाराष्ट्रातलं काम राहिलंय. या हायवेला मी जेएनपीटीपर्यंत नेणार आहे. माझी इच्छा होती की वसई-विरारपासून वरळी बांद्र्यापर्यंत हा मार्ग जोडला तर नरीमन पॉइंटवरून थेट दिल्लीला १२ तासांत पोहोचता येईल”, असं ते म्हणाले.
जिल्ह्यात मेट्रोचे जाळे वाढणार
पुण्यापासून कोल्हापूर, सोलापूर, बारामती, नगर, लोणावळा या मार्गावरील ब्रॉडगेजवर आठ डब्यांची मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमध्ये विमानासारखी सोय असणार आहे. याचे तिकीट एसटी बसएवढं असेल.