- उद्धव धुमाळे
संत गाडगेबाबा यांनी स्थापन केलेली आळंदीतील धर्मशाळा अनेकांना माहीत आहे, पण बाबांचे कीर्तन, प्रवचन ऐकून ग्रामीण भागात शाळा सुरू करत निष्ठेने ज्ञानदानाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती आपल्याला अभावानेच माहीत असते. यात विशेष करून गाडगेबाबांच्या पश्चात त्यांचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेल्या जुन्नर तालुक्यातील ओतूर गावच्या श्री गाडगे महाराज विद्यालयाचा उल्लेख आवर्जून करावा लागतो. योगायोगाने या शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापक लोकमत कार्यालयात आलेले. त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेण्याची उत्सुकता मी व्यक्त केली. त्यावर संपादकांनी देखील होकार दिला आणि भेटीची तारीख निश्चित केली.
ठरल्याप्रमाणे गुरुवारी सकाळी ओतूर (ता. जुन्नर) गाव गाठले. सोबत लेखक सुशील धसकटे होते. सुमारे ४० हजार लोकवस्तीचे गाव. आसपास चारपाच धरणं असल्याने बागायती शेती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा भाग सधन. संत तुकाराम महाराज यांना उपदेश करणाऱ्या बाबाजी चैतन्य यांची समाधीही याच ओतूर गावात आहे. कपर्दीकेश्र्वरांचे निसर्गरम्य मंदिर असल्याने श्रावणात भाविकांची मोठी गर्दी होते. महात्मा फुले यांचे सहकारी डुंबरे पाटील मंडळीही याच भागातील. ज्येष्ठ लेखक व पत्रकार डॉ. अनिल अवचट यांचे मूळगाव ओतूर. त्यामुळे गावाला ऐतिहासिक, आध्यात्मिक, सामाजिक वारसा लाभलेला.
संत गाडगे महाराज यांचेही ओतूर गावात कीर्तन झालेले. "बापहो, विद्या हे मोठं धन आहे. ज्याले विद्या नसन ते गरिबीत राहिले. त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल. आता तरी सुधारा अन् मुलाले शिक्षण द्या... पैसे नसेल तर एकवेळ जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा. बायकोले लुगडं कमी भावाचा घ्या, पण मुलाले शाळेत घातल्याशिवाय राहू नका," असे संत गाडगेबाबा सांगतात. बाबा केवळ उपदेश करून थांबत नाहीत, तर जागोजागी शाळा सुरू करून शिक्षण घेण्यासाठीची सोयदेखील करतात.
"सेवा परमो धर्म" हेच गाडगेबाबांचे ब्रीद होते. म्हणूनच त्यांना कर्मयोगी असे संबोधले गेले. गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या प्रल्हाद मारोतीराव पाटील आदी काही समाजधुरींनी एकत्र येत ओतूर गावात १९६० साली आदिवासी मुला-मुलींसाठी श्री गाडगे महाराज विद्यालयाची स्थापना केली. "सेवा परामो धर्म" या ब्रिदानुसार आजही शाळेची वाटचाल सुरू आहे. याचा प्रत्यय शाळेत प्रवेश करताच येतो. श्री गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष, दलित मित्र प्रल्हादराव मारोतीराव पाटील यांनी हा वटवृक्ष लावला आणि वाढवला. त्यांच्या पश्चात हा वारसा त्यांचे पुत्र नितीन पाटील समर्थपणे सांभाळत आहेत. शाळेत प्रवेश करताच अगदी प्रसन्न वाटते. कारण परिसर अतिशय स्वच्छ, वर्गनिहाय विद्यार्थ्यांचा गणवेश आणि शिस्त वाखाणण्याजोगी आहे.
संत गाडगेबाबा यांनी सांगितलेली, ''भुकेल्यांना जेवण, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्र, निरक्षरांना शिक्षण, बेघरांना आसरा, रोग्यांना औषधोपचार, बेराेजगारांना रोजगार, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणीच लग्न आणि निराश व्यक्तींना हिम्मत देणे ही दहा सूत्रे आम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, हीच आमची देवपूजा आहे," असे संस्थेचे संचालक नितीन पाटील नम्रपणे सांगतात. याच विचार आणि कार्यामुळे या शाळेत आलेली प्रत्येक व्यक्ती रमून जाते. राजकारण्यांपासून अभिनेत्यांपर्यंत, अभ्यासक, पत्रकारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच ही शाळा आपली वाटते. अशोक सराफ या शाळेत राहून गेले. या शाळेत शिकलेली अनेक मुलं जगभर आणि वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आत्मविश्वासाने वावरत आहेत, असे नितीन पाटील आणि मुख्याध्यापक ए. एस. मुलाणी अभिमानाने सांगतात. विशेष म्हणजे या शाळेत लावलेली कर्तृत्ववान महिलांची यादी लक्षवेधी ठरत आहे.
शिक्षणातील त्रिमूर्ती :
देशातील मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू करून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची ज्याेत पेटवली. त्यांचे आदर्श संत नामदेव आणि संत तुकाराम महाराज. हाच वारसा पकडून संत गाडगेबाबा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संत तुकाेबा आणि जाेतिबा यांचे हात पकडून ज्ञानाची ज्याेत राज्याच्या कानाकाेपऱ्यात पाेहाेचविण्याचे काम केले. गाडगेबाबा म्हणतात, ‘जेवणाच ताट माेडा; पण मुलांना शिकवा’. बाबासाहेब म्हणतात, ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ कर्मवीर म्हणतात, ‘कमवा आणि शिका’. या तीनही महापुरुषांनी शिक्षणाची गंगा घराेघरी पाेहाेचवली. त्यामुळे हे तिघे खऱ्या अर्थाने शिक्षणातील त्रिमूर्ती असून, त्यांचा विचार ओतूरच्या श्री गाडगेबाबा शिक्षण संस्थेतून नव्या पिढीला दिला जात आहे.