नीरा (पुणे) : संत सोपानकाकांचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील शेवटचा मुक्काम मांडकी येथे घेऊन जेऊर, पिंपरे (खुर्द) मार्गे नीरा शहरात विसावला. अहिल्याबाई होळकर चौकात रथातून पालखी खांद्यावर घेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. नीरेतील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले.
आज शनिवारी सकाळी पुरंदर तालुक्यातील बागायती गाव म्हणून ओळख असलेल्या मांडकी गावचा मुक्काम आटपून, जेऊर मार्गे पिंपरे (खुर्द) येथे सकाळच्या न्याहरीसाठी विसावला. जेऊर येथे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी सकाळी सातच्या सुमारास पालखीचे स्वागत केले. नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शिवाजी चौकात पालखी रथाचे आगमन साडेअकराच्या सुमारास झाले.
सोहळ्याच्या स्वागतासाठी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, सोमेश्वरचे संचालक जितेंद्र निगडे, गुळुंचेचे माजी सरपंच संतोष निगडे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, अनंता शिंद, संदिप धायगुडे, अनिल चव्हाण, मुकुंद ननवरे, बाळासाहेब ननवरे, कांचन निगडे, विजय शिंदे, राजेश चव्हाण, चंदरराव धायगुडे, कल्याण जेधे, ग्रामसेवक मनोज डेरे यांनसह भाविक ग्रामस्थ उपस्थित होते.
आहिल्यादेवी होळकर चौकात रथातून पालखी उत्साही भाविकांनी खांद्यावर घेऊन विठ्ठल मंदिरात ठेवली. दुपारच्या या विसाव्याच्या काळात परिसरातील नागरिकांनी रांगालावुन पालखीतील सोपानकाकांच्या पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. दरवर्षी सोपानकाकांच्या या पालखी सोहळ्यात दिंड्यांचे प्रमाण वाढते आहे. या वर्षी सोहळ्यात ६ दिंड्याची वाढ झाली असून आता १०० दिंड्या सहभागी झालेल्या आहेत.
संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा विसावल्यानंतर सोहळ्यातील भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठल मंदिर सभागृहात अन्नदान करण्यात आले. दुपारी तीन वाजता पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यातील निंबुत येथील मुक्कामासाठी प्रस्थान होणार असल्याचे माहिती दिली चोपदार रणवरे यांनी दिली.
मागच्या सोहळ्यापेक्षा प्रत्येक दिंडित दिडपट समाज वाढलाय. शासनाने ठिकठिकाणी सावली केली आहे. शासनाने वाढिव चार टँकर, मेडिकल सुविधा जास्तीची ठेवली आहे. चार ॲम्बुलन्स आहेत. एक कार्डिया ॲम्बुलन्स ऑन कॉल ठेवली आहे. यावर्षी उन्हाचा त्रास होतोय पण वारी ही विठ्ठल नामाचा हरी नामात दंग होऊन चालत आहेत. वैश्णवांच्या उत्साहत कोणतीच कमी नाही, आनंद सोहळा आहे"
- त्रिगुण गोसावी (सोहळा प्रमुख, श्री. संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, सासवड)