सासवड : येथील संत सोपानदेव समाधीस वासंतिक चंदनउटी व भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामकृष्ण हरीचा जयघोष करीत टाळमृदंगाच्या तालात चंदनउटीचा लेप देण्यात आला. यानिमित्त समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांच्या माळांची सजावट तसेच विविध प्रकारच्या फळांची आरास करण्यात आली होती.
श्रीक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विणेकरी हभप नरहरी महाराज ढाकणे आणि संत सोपानदेव महाराज मंदिराचे पुजारी पुरंदरे यांनी सर्व विधी पार पाडला. या वेळी संत सोपानदेव समाधी मंदिराचे व्यवस्थापक हिरुकाका गोसावी, विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी, गौतम महाराज गोसावी, सुहास निबंधे, चोपदार सिद्धेश शिंदे, सुधाकर गिरमे, सोनोरी गावचे माजी सरपंच बाळासाहेब काळे, कीर्तनकार हभप सृष्टी महाराज काळे, ओंकार निरगुडे, पंढरीनाथ माळवदकर, नामदेव काळे, सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पहाटे काकडा आरती करून समाधीस अभिषेक घालून महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ ते १२ या वेळेत हरिपाठ करण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत शास्त्रोक्त पद्धतीने चंदनउटीचा लेप देण्यात आला. त्यानंतर हभप सीताराम महाराज झेंडे यांचे प्रवचन तर संध्याकाळी डांगे पंच मंडळी आळंदी यांच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
फोटो ओळ : क्षेत्र सासवड (ता. पुरंदर) येथील संत सोपानदेव समाधीस सुगंधी चंदनउटीचा लेप देण्यात येऊन महापूजा करण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवर.