बारामती/लासुर्णे - तुझा पाहूणी सोहळा, माझा रंगला अभंगगेला शिणवटा सारामेघ झाले पांडुरंग
नाम तुकोबाचे घेताडोले पताका डौलातअश्व धावता रिंगणीनाचे विठू काळजात
अशी भावना अश्व रिंगणाचा अनुपम्य सोहळा अनुभवताना वारकरी भाविकांच्या मनात असते. शिण घालवणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदूंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष लहान-थोरांचां दांडगा उत्साह रिंगण सोहळ्याची भव्यता वाढवतो. जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे गुरूवारी (4 जुलै) मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं.
सणसर येथील मुक्कमानंतर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पहिल्या अश्वरिंगणासाठी बेलवाडी येथे ‘ज्ञानोबामाऊली-तुकाराम’ अशा जयघोषात आगमन झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती. अश्व रिंगण सोहळ्याची सुरूवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांचे रिंगण झाले. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकऱ्यांचे रिंगण पार पडले. यावेळी विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल-वृद्धांचे भान हरपले.
वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. यानंतर मानाच्या अश्व रिंगणाला सुरूवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानोबा-तुकाराम चा एकच जयघोष केला. या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले. यावेळी अश्व पुढे जाताचत्याच्या चरणी असणारी रज भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. यानंतर महिला-पुरूषांनी फुगड्यांचे फेर धरले. तर कोणी टाळ मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला. विठ्ठलाच्या दारी कोणी लहान-थोर नाही. या भावनेने प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडत होते.
तत्पूर्वी, आमदार दत्तात्रय भरणे, कांतीलाल जामदार, सरपंच माणिक जामदार, तहसीलदार सोनाली मेटकरी, उपसरपंच स्वाती पवार, उपविगीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सहायक पोलिस निरिक्षक दिलीप पवार, वालचंदनगर कंपनीचे कार्यकारी संचालकजी. के. पिल्लई आदींनी पालखी रथाचे स्वागत केले. पालखी रिंगण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.