उरुळी कांचन: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यामध्ये उरुळी कांचन येथील पालखी विसावा यात बदल विश्वस्तांनी केला होता. या विश्वस्तांच्या बदला संदर्भात उरुळी कांचन ग्रामस्थ पुढारी यांची मागील काही दिवसांपूर्वी राम मंदिरात बैठक होऊन जर पालखी परंपरेनुसार गावामध्ये आली नाही तर गावबंद असहकाराची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये विश्वस्तांनी वर्षानुवर्ष आश्रम रस्त्याने भैरवनाथ मंदिराकडे पालखी जाते . तो मार्ग विश्वस्तानी रद्द केला होता. त्याचा विरोध ग्रामस्थ व नेतेमंडळी करीत होती. बुधवारी (दि०३) रोजी पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन एलाईट चौकामध्ये आली असता ग्रामस्थांनी पालखी पारंपारिक रिवाजाने गावाला प्रदक्षिणा घालून मार्गस्थ करावा अशी मागणी केली. मात्र त्याला विश्वस्तांनी विरोध केल्याने ग्रामस्थांनी नगारा रथ अडवून धरला. वाढत्या नागरीकरणाचे व रस्त्याचे कारण विश्वस्तांनी दिले होते. सालाबादप्रमाणे उरळीकांचन शहरांमधून पालखी जावी व पुढे विश्रांतीसाठी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर थांबावी यासाठी ग्रामस्थ पुढारी नेते मंडळी आग्रही होते. परंतु पालखी चौकात येण्याअगोदर ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थ, पुढारी चौकामध्ये ठिय्या मारून भजन करत बसले होते. पोलीस प्रशासनने त्यांना रस्त्यावरून बाजूला करत पालखीला रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांचा हा गोंधळ पाहून विश्वस्तांनी नगारा बैलगाड्याचे बैल सोडून विरोध दर्शवला. यामध्ये ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, व विश्वस्त यांच्यात वादावादी झाली. या वादविवादानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः नगारा रथ ओढत पुढे नेला व नगाऱ्याला बैल जुंपण्यास सांगितले. ग्रामस्थांनी यावेळेस माणिक मोरे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. या गोंधळानंतर पालखी उरुळी कांचन शहरात विसाव्यासाठी न जाता पुढे निघून गेली. वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली. पालखी विसाव्या ठिकाणी न गेल्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे बऱ्याच भाविकांना पालखीचे दर्शन घेता आले नाही. पालखी विसावा महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होता यासाठी दर्शन मंडप सुद्धा टाकण्यात आला होता. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. महात्मा गांधी महाविद्यालय मैदानावर पालखी विसावा मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे आम्ही लोक महामार्गावर गर्दी न करता महाविद्यालयाच्या मैदानावर गेलो होतो. परंतु पालखी विसाव्यासाठी न आल्याने आम्हाला दर्शन घेता आले नाही. यावर्षी आमचे पालखीचे दर्शन झाले नाही असे पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी सांगितले.
...तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो रात्री कदमवाक वस्ती येथे विश्वस्तांबरोबर चर्चा करून सालाबाद प्रमाणे पालखी मार्ग ठेवावा यासाठी विनंती केली होती. परंतु बाकी विश्वतांपेक्षा माणिक मोरे यांनी विरोध केला व पंचक्रोशीतील भाविकांचे मन दुखावले आहे. एकट्याच्या या आडमुठेपणा धोरणामुळे वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली आहे. आमच्यामुळे जर वारकऱ्यांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. - उरुळी कांचन सरपंच अमित कांचन.