निळकंठ भोंग
निमगाव केतकी: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' अशा भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माउली तुकाराम' च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज निमगाव केतकी येथे सायंकाळी आगमन झाले. निमगाव केतकी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रवीण डोंगरे यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत 'निर्मळ वारी हरित वारी' च्या माध्यमातून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच प्लास्टिकमुक्त गाव, प्रदूषणमुक्त वारी, वैद्यकीय पथके पर्यावरण हरित संतुलनासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. पाणी, विज,कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली आहे, ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक आबा जगताप यांनी दिली.
निमगाव केतकी या ठिकाणी चौकाचौकात विविध पतसंस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी स्वागत कक्ष कमानी, मंडप उभारले गेले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकºयांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरविल्या. सर्व वातावरण हरी भक्तांनी गजबजून गेल्याचे चित्र होते.
...निमगाव केतकी येथे अनेक संस्था व नागरिकांकडून अन्नदान
मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर तालुका आणि इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शीरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमाद्वारे धार्मिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. अष्टविनायक पतसंस्था, सिद्धिविनायक पतसंस्था देवराज पतसंस्था, मयुरेश्वर पतसंस्था, अष्टविनायक ग्रुप, सोपानराव चॅरिटेबल ट्रस्ट, सुवर्णयुगेश्वर पतसंस्था, केतकेश्वर पतसंस्था, सुवर्णयुग पतसंस्था, त्याचप्रमाणे कुंडलिक कचरे सुनील खामगळ मित्र परिवाराच्या वतीने हजारो वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली.