यवत : संत तुकाराम महारज पालखी सोहळ्याने यवत येथील मुक्काम आटपून पंढरपूरकडे प्रस्थान केले . काल ( दि. २५ ) रोजी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामासाठी थांबला होता. यंदा पालखीबरोबर वारकऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येत होती. मंदिरात पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावाल्यानंतर मंदिराबाहेर रात्री उशिरा पर्यंत पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. पहाटे परत दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाने व ग्रामस्थांनी दर्शनासाठी चांगले नियोजन केल्याने रांगेत दर्शन घेता आले.
रात्री कीर्तन, हरिजागर पहाटे काकड आरती, अभिषेक आदी धार्मिक विधी पार पडल्यानंतर सकाळी पालखीने मंदिरातून प्रस्थान केले . यवत गावातून खांद्यावरून पालखीची गावप्रदक्षिणा झाली. शाळेच्या मैदानात आरती झाल्यानंतर पालखी परत रथात विराजमान करून मार्गस्त करण्यात आली.
यवत मधून पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर भांडगाव येथे दुपारच्या विश्रांती साठी पोहोचला तत्पूर्वी ठिकठीकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. भांडगाव येथे दरवर्षी विठ्ठल मंदिरात पालखी सोहळा विसावतो. मात्र यंदा सोहळा विश्वस्तांनी पालखी रथ केवळ गावात नेऊन परत आणला तर पालखी भांडगाव फाटा येथे विश्रांती साठी थांबविण्यात आली.