देहू : हरिनामाचा गजर, टाळ - मृदंगाच्या वादनात अन् संत तुकाराम महाराजांच्या जयजयकार करत देहूतून तुकोबांच्या चांदीच्या चलपादुकांनी सकाळी पावणे दहाच्या सुमारास पंढपूरकडे प्रस्थान ठेवले. यापार्श्वभूमीवर शासनाकडून पालखी प्रवासासाठी देण्यात आलेल्या दोन्ही विशेष शिवशाही बसमध्ये निमंत्रीत चाळीस वारकऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तात पंढरीला रवाना झाल्या आहेत.
आज पहाटे ४ च्या सुमारास नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर ५.३० वाजता पादुका पूजन झाले. सकाळी सातच्या सुमारास चलपादुकांसमोर दैनंदिन कीर्तन सेवा पार पडली. दरम्यान फुलांनी सजवलेल्या दोन्ही विशेष बस पोलीस बंदोबस्तात मंदिराबाहेर आणून सज्ज करण्यात आल्या. त्यानंतर निमंत्रित वारकऱ्यांना सॅनिटाईज करून बसमध्ये प्रवेश दिला. सकाळी नऊच्या सुमारास तुकारामांना नैवैद्य दाखवून मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ - मृदुंगाच्या गजरात ''संत तुकाराम महाराज कि जय'' अशा जयघोषात पालखी सोहळा प्रमुख भानुदास मोरे यांनी पादुका हातात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर पादुका बसमध्ये फुलांनी सजविलेल्या पहिल्या खुर्चीवर विराजमान करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, आदी उपस्थित होते. यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हा सोहळा संपन्न होईल. मानाच्या पालख्या विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी होईल.