पाटस : हरिनामाचा जागर, ज्ञानोबा माउली तुकारामाचा जयघोष, खांद्यावर भगवे ध्वज, अंगावर पावसाच्या हलक्या सरी घेत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांनी दीड किलोमीटरचा वळणदार ‘पाटस-रोटी’ घाट पार केला. टाळ- मृदंगाचा गजर, महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन तर वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवा ध्वज हे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी पाटस-रोटी घाटात पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, पालखी सोहळ्यामुळे अवघा परिसर दुमदुमला होता. मजल दरमजल करीत साधारणत: दोन तासांच्या कालावधीनंतर पालखी सोहळा रोटी या गावात विसाव्यासाठी गेला. तत्पूर्वी रोटी गावाच्या शिवेवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची आरती झाली.
यवत येथील पिठलं-भाकरीचा भोजनरूपी महाप्रसाद घेऊन पालखी मार्गावरील काळभैरवनाथ, रोकडोबानाथ, बोरमलनाथ, गोपीनाथ या चार नाथांचं दर्शन घेत पालखी सोहळा वरवंडला मुक्कामी आला. दुसऱ्या दिवशी पहाटे पालखी पाटसच्या दिशेने मार्गस्थ झाली. कवठीचामळा, भागवतवाडी येथील भाविकांच्या स्वागतानंतर पालखी सोहळ्याने पाटस गावात प्रवेश घेतला. पालखी मार्गावर येथील अशोक गुजर यांनी नेहमीप्रमाणे कलात्मक रांगोळी रेखाटली होती. तसेच जनसेवा तरुण मंडळ, मुंजाबा चौक, ग्रामपंचायत पाटस, प्राथमिक आरोग्य केंद्र पाटस यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा ठेवण्यात आली होती. पाटसचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात पालखी विसाव्यासाठी थांबली होती. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हार, फूल, प्रसाद, खेळणे, विठुरायाची भक्तिगीते यामुळे नागेश्वर मंदिराच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. प्रथेप्रमाणे दिवंगत कमलाकर देशपांडे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने पालखीला नैवेद्य दाखविण्यात आला तर ग्रामस्थांच्या वतीने वारकरी भक्तांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती होती. विसाव्यानंतर पाटसच्या ग्रामस्थांचा निरोप घेत पालखी सोहळा पाटस-रोटी घाटाकडे मार्गस्थ झाला. रात्री पालखी सोहळ्याचा मुक्काम बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे आहे.