निमगाव केतकी: "हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी " अशा भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माउली तुकाराम' च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे राज्यात नागवेलच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी येथे सायंकाळी ४.३० वाजता मुक्कामी दाखल झाली.
सवंदडीच्या माळावर गावातील भजनी मंडळासह ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. निमगाव केतकी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रवीण डोंगरे, दादाराम शेंडे, बाबासाहेब भोंग, सोमनाथ आदलिंग, सुनिता शेंडे वैष्णवी चांदणे, यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निमगाव केतकी येथे सराफवाडी रोड पालखीतळ या ठिकाणी असतो. आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निमगाव केतकी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने तयारी केली होती.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पालखीच्या पुढे २७ मानाच्या दिंड्या तर पालखीच्या पाठीमागे ३७६ दिंड्यांचा सहभाग सहभागी झाल्या आहेत. व अंदाजे चार लाखाहून अधिक भाविक संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. मराठवाडा, विदर्भ, खानदेश अन्य भागात चालू वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे या भागातील भाविकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसून येत असून वारी ही आनंदमय होत असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ह.भ. प माणिक महाराज मोरे यांनी दैनिक लोकमतशी बोलताना दिली.