देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी ३३५ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान सज्ज झाले आहे. शुक्रवारी (दि. १२) दुपारी दोनच्या सुमारास मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत प्रस्थान होणार आहे. तत्पूर्वी श्री संत तुकाराम महाराज मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मंदिरात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
प्रस्थान सोहळ्यासाठी गावात कोणीही भाविक व वारकऱ्यांना सोडण्यात येणार नाही. त्यासाठी गुरुवारपासून गावच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. शुक्रवारी पहाटे चारला विठ्ठल रुख्मिणी मंदिरात काकडारती व अभिषेक महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे व विश्वस्तांच्या उपस्थितीत होईल. साडेचारला श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा होईल. पाचला वैंकुठगमण मंदिरातील महापूजा संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते होणार आहे. सकाळी सहाला पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची पुजा होईल. नऊला सेवेकरी मसलेकर हे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन भजनी मंडपात आणतील. दहाला श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी आजोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने होणार आहे. काल्याच्या किर्तनांनतर सेवेकरी मसलेकर हे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका श्री विठ्ठल रुख्मिणी यांची भेट घालून कीर्तन मंडपात प्रस्थान ठिकाणी आणतील. दुपारी दोनला प्रस्थान सोहळ्याला सुरवात होईल.
संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते विधिवत परंपरेप्रमाणे प्रस्थान होणार असल्याची माहिती सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी दिली. प्रस्थान झाल्यानंतर पादुका पालखीमध्ये ठेवून मंदिराला प्रदक्षिणा होईल. यानंतर पालखी किर्तन मंडपात ठेवून सायंकाळी सहाला समाज आरती, कीर्तन, जागर होईल. शुक्रवारी वारकऱ्यांनी, ग्रामस्थांनी गर्दी करू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावला आहे, असे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले.
मंदिर व परिसरात १० लीटर सोडीयम हायपो क्लोराईड व व्हिरेक्स या रसायनाने निर्जंतुकीकरण केले. पिंपरी येथील क्रिएटिव्ह इंडस्ट्रियल हायटेक सर्व्हिसेस संस्थेतर्फे विजय बोत्रे यांनी त्यासाठी सहकार्य केले.