ग्रामपंचायत कार्यालयात आज ( दि.१०) रोजी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुणाल धुमाळ , ग्रामसेवक घाडगे , गावकामगार तलाठी जाधव यांनी काम पाहिले.सरपंच पदासाठी संतोष मधुकर दोरगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंच पदासाठी रुपाली राहुल खळदकर व शीतल विजय दोरगे यांचे अर्ज आले होते.मात्र उपसरपंच निवडीच्या वेळी शीतल दोरगे व इतर एक सदस्य अनुपस्थित राहिले.तर उपस्थित सर्व नऊ सदस्यांनी रुपाली खळदकर यांना मत दिल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.निवडणुकी वेळी सदाशिव कुंडलिक दोरगे , सिंधू शंकर हरपळे , तुषार राजू दोरगे , नंदा नवनाथ जाधव , रुपाली राहुल खळदकर , सुनंदा सदाशिव गायकवाड , लक्ष्मण बबन काटकर , संतोष मधुकर दोरगे व नीलम संदीप दोरगे उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत ११ पैकी ७ जागा बिनविरोध निवड झाल्यानंतर ४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २ जागा बिनविरोध पॅनेलच्या उमेदवारांनी तर २ जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती.
मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्याने भांडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची ठरत असते .कुल व थोरात गटात तुल्यबळ लढत येथे रंगते. यावेळी मात्र आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात दोन्ही गटातील पॅनल प्रमुखांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता .त्यानुसार कुल गटाला ६ जागा तर थोरात गटाला ५ जागा असे सत्तेचे अडीच अडीच वर्षे ठरले होते. ५ जागा असणाऱ्या प्रथम सरपंच पद व दुसऱ्या गटाला उपसरपंच पद तर पुढील अडीच वर्षानंतर दुसऱ्या गटाला सरपंच व उपसरपंच पदाचे वाटप ठरले होते.
दोन्ही गटात ठरलेल्या समझोत्या प्रमाणे ११ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या मात्र कुल व थोरात गटातील काहिंना निर्णय न पटल्याने ४ जागांसाठी निवडणूक लागली होती.४ जागांसाठी बिनविरोध पॅनल व अपक्ष यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली.यात २ जागा अपक्षांना तर २ जागांवर बिनविरोध पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली होती.
४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर दोरगे यांचे पुत्र संतोष दोरगे , सदाशिव कुंडलिक दोरगे , अपक्ष शीतल विजय दोरगे व प्रमोद रामचंद्र दोरगे विजयी झाले होते.
चार जागांसाठी निवडणूक झाल्यानंतर सत्तेची गणिते बदलली असली तरी बिनविरोध निवडणुकीचा निर्णय घेणाऱ्या पॅनल प्रमुखांनी सत्तेचा फॉर्म्युला आगोदर ठरलेल्या प्रमाणे राबविण्याचा निर्णय घेतला होता.यासाठी कुल गटाच्या वतीने लक्ष्मण काटकर , लक्ष्मण दोरगे व दत्तात्रय दोरगे तर थोरात गटाच्या वतीने माजी पंचायत समिती सभापती मधुकर दोरगे , विद्यमान उपसभापती नितीन दोरगे व विजय ढोणे यांनी प्रयत्न केले होते.
तिसऱ्या पिढीने पटकावले सरपंच पद.
भांडगाव गावाच्या सरपंच पदावर एकाच कुटुंबातील सलग तिसऱ्या पिढीतील व्यक्तीने वर्णी लावल्याने अनोखा विक्रम ठरला आहे.संतोष मधुकर दोरगे यांची आज सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. यापूर्वी त्यांचे वडील मधुकर कृष्णाजी दोरगे सन १९९० ते १९९५ दरम्यान गावात सरपंच होते.तर आजोबा कृष्णाजी शंकर दोरगे सन १९५८ ते १९६८ मध्ये सलग १० वर्षे सरपंच होते.
फोटो ओळ :- भांडगाव (ता.दौंड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी संतोष दोरगे व उपसरपंच पदी रुपाली खळदकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना लक्ष्मण काटकर व माजी उपसभापती नितीन दोरगे व मान्यवर